Showing posts with label अशोक वाडकर. Show all posts
Showing posts with label अशोक वाडकर. Show all posts

तीन गझला : अशोक वाडकर

 



१.


साऱ्याच संकटांचे आभार मानले मी

केले मला शहाणे आधार मानले मी


विद्येस जीवनी मी अनमोल स्थान देतो

व्यवहार अन्य सारे बाजार मानले मी


स्मरतो मनोमनी मी एकाच देवतेला

सृष्टीस देवतेचा अवतार मानले मी


गातो सदा खुशीने कविता सदैव ताजी

गझले, तुझ्या कृपेचे आभार मानले मी


ओठावरी नव्याने गाणे जुळून आले

अन् भारल्या स्वरांचे उपकार मानले मी


त्यांची हयात सरली जनतेस न्याय देण्या

सत्तेस वंदणारे लाचार मानले मी


२.


अताअताशा नव्या स्वरांना सजवत गेलो

अता कुठे मी बहर खुशीचे उधळत गेलो


नव्या स्वरांचे... नवेच गाणे, नवे तराणे 

मनामनातुन दिशादिशांतुन घुमवत गेलो


कुणी जमवले सुरासुरांशी सुरेल नाते ?

अशा अनोख्या कुतूहलांनी जखडत गेलो


क्षणाक्षणांनी सुरासुरांशी जमून आले

नवे तराणे रमतगमत मी जुळवत गेलो


असे कसे हे मला मिळाले नशीब दैवे

असा कसा मी क्षणाक्षणांनी उजळत गेलो

                     

३.


कवळू कशास दु:खा? मन हे सुजाण आहे

मग का मनात भित्र्या सुचते भयाण आहे ?


गुरुची मनात वस्ती, मजला सदा दिलासा

समजू नकोस मित्रा मन हे अजाण आहे


रमतो मनोमनी मी अन् मी सुखात न्हातो

रणकंदणात आता चकवा भयाण आहे


जमतो क्षणात मेळा, रुचता झणी खुलासा

फसव्या अनूभुतींचा भडका विराण आहे

                       

छळती अनेक शंका पटती न हे खुलासे

हळव्या मनात माझ्या भलतेच त्राण आहे      

.....….....................................

अशोक म. वाडकर,

कोल्हापूर