Showing posts with label मनीषा नाईक. Show all posts
Showing posts with label मनीषा नाईक. Show all posts

तीन गझला : मनीषा नाईक

 



१.


डोळ्यांमधले अथांग पाणी म्हणजे तू 

ओठावरचे हसू गुलाबी म्हणजे तू 


एखादी नशा हवी जर जगण्यासाठी 

माझ्यासाठी मदिरा साकी म्हणजे तू


प्रवास तर आहे खडतर आयुष्याचा

गर्द सावली, जंगल झाडी म्हणजे तू


सुखदुःखाचा रिचवत प्याला जगते मी

जगण्यामधली एक खुमारी म्हणजे तू


श्वासांचा नियमित दिनक्रम चालू असतो

कळ एखादी काळजातली म्हणजे तू


फक्त उन्हाळा ऋतू दिला आयुष्याने

सर एखादी खास मृगाची म्हणजे तू


तुझ्याविना जगणे माझे जगणे नाही

चीज जरूरी श्वासाइतकी म्हणजे तू


आभासी, नश्वर आहे जगात सारे 

फक्त शाश्वती नात्यामधली म्हणजे तू

 

या देहाचा पाचोळा झाल्यावरती

एखादी पडलेली ठिणगी म्हणजे तू


२.


कुणा खेद, चिंता उद्याची नसावी 

नवी रोज आशा इथे जन्म घ्यावी  

 

गळा भेट होता इथे माणसांची 

मनातील कटुता दरी नष्ट व्हावी   


खलांचा जनातील संहार व्हावा 

अशी एक होळी इथे पेटवावी 


इथे वाढवा जंगले दाट वस्ती 

मुला पाखरांनीच शाळा भरावी 


निळा सावळा रंग व्यापून जावा     

इथे आज राधा पुन्हा कृष्ण व्हावी 


पडू दे दिमाखात पाऊस पहिला 

सुखाने नदीपात्र इथली भरावी 


भुकेल्या जिवांची प्रतीक्षा सरावी 

नव्याने धरा आज गर्भार व्हावी 


गुलाबी मनाने पुन्हा भिरभिरावे  

ऋतूंची फुलांना पुन्हा हाक यावी 


पुन्हा सार या जीवनाचे कळावे   

पुन्हा सर्व सृष्टी इथे बुद्ध व्हावी


३.


एकाच किनाऱ्यावर दोघे 

बहुधा होऊ सागर दोघे 


बरेच काही मनात आहे 

बोलू , पण सुचल्यावर दोघे 


वाद नको कुठल्या मुद्यावर 

दोघे चूक, बरोबर दोघे 


थोडे थोडे सरकत राहू 

खोडू मधले अंतर दोघे 


एकमेकात मिसळत गेलो

दोघे पाणी, साखर दोघे 


ठसठसणाऱ्या जखमेवरती  

हसून घालू फुंकर दोघे 


ऊन, पाऊस सोसत गेलो

म्हणून बनलो कणखर दोघे 


मिठीत आलो मग दरवळलो

बहुधा झालो अत्तर दोघे

............................................