Showing posts with label सतीश देशमुख. Show all posts
Showing posts with label सतीश देशमुख. Show all posts

तीन गझला : सतीश देशमुख

 





१.


सरणावरी कुणाला संपर्क काय सांगू

मी स्वर्ग काय सांगू मी नर्क काय सांगू


आयुष्य ऐतिहासिक घटितासमान माझे

मी तथ्य काय सांगू मी तर्क काय सांगू


आहे जहर विषारी सर्वांत माणसाचे

सापा तुझ्या विषाचा मी अर्क काय सांगू


कुठलीच होत नाहित पैशाशिवाय कामे

ऑफिसमधील त्यांचे मी वर्क काय सांगू


दुनिया जरी बुडाली चिंता मला न त्याची

इतका तुझ्यात गझले मी गर्क काय सांगू


२.


कोण माझी पालखी घेऊन आले

चालणे काट्याकुपाट्यातून आले


मी उजेडाची अपेक्षा काय केली

नेहमी आभाळ अंधारून आले


यामुळे शिकलो कदाचित चालणे मी

पाय माझे खाचखळग्यातून आले


जन्म होता कास्तकाराचा मिळाला

मग मरण नक्कीच फासातून आले


लागला ना सावलीचा थांगपत्ता

नेहमी नशिबात माझ्या ऊन आले


३.


धर्मात ना कुणाच्या जातीत जन्मलो

मी फक्त माणसाच्या जातीत जन्मलो


वृक्षासमान आहे हा देश आमचा

आम्ही फुलाफळाच्या जातीत जन्मलो


हा जन्म काय झाला माझा कवी म्हणुन

साऱ्या चराचराच्या जातीत जन्मलो


शोधू नका कुणीही माझ्यात सावली

मी नेहमी उन्हाच्या जातीत जन्मलो


या भारतात होते जन्मायचे मला

माझ्या, तुझ्या नि त्याच्या जातीत जन्मलो


उर्दू गझल तशी तू आहेस साजणी

मी एक शायराच्या जातीत जन्मलो


तुमच्या जगात आहे मी फार वेगळा

मी वेगळ्या जगाच्या जातीत जन्मलो

.............................................