Showing posts with label डॉ. अर्चना जुनघरे. Show all posts
Showing posts with label डॉ. अर्चना जुनघरे. Show all posts

तीन गझला : डॉ. अर्चना जुनघरे

 




१.


अक्षर अक्षर एक होउनी बनते पुस्तक

पायाभरणी संस्कारांची करते पुस्तक


अधिकारावर गदा आणते जेव्हा कोणी

ढाल होउनी बाबा तुमचे लढते पुस्तक


फोन पाहते ज्याच्या-त्याच्या हातामध्ये 

एकांती मग हतबलतेने रडते पुस्तक


कुशीत अपुल्या मोरपिसाची राखण करते

तिने स्पर्शता गालांमध्ये हसते पुस्तक


शिवाय माझ्या मित्र चांगला कुणी दाखवा

खांद्यावरती हात ठेवुनी म्हणते पुस्तक


२.


खोटे पडदे गेले सरकत थोडे थोडे

रंग खरे मग आले उमजत थोडे थोडे


उंच भरारी पोर घेउनी उडून गेला

श्वास माउली बसली मोजत थोडे थोडे


गोड स्मृती ज्या ओंजळीत मी गोळा केल्या

क्षण सारे ते गेले निसटत थोडे थोडे


संदेहाचे वादळ जेव्हा घरात आले

बंध मनाचे गेले फाटत थोडे थोडे


दूर किती मी मला ठेवले तुझ्यापासुनी

तरी कसे मन गेले गुंतत थोडे थोडे


बसून होते एके काळी डोळ्यांमध्ये 

नजरेमधुनी गेले उतरत थोडे थोडे


३.


आयुष्याच्या कोड्यांना मी उकलत गेले

काही मिळवत काही तेथे गमवत गेले


आधाराने माझ्या जे जे जिंकत होते

संधी मिळता तेही मजला हरवत गेले


विणले होते नाते आपण विश्वासाने

धागे तरिही प्रेमाचे का उसवत गेले?


आनंदाने संसाराला गुणले बाई

अन् पाढ्यांना दुःखाच्या मी गिरवत गेले


बाबा, भाऊ, नवरा आणिक पोरांचेही

 उंबरठे मी हक्कासाठी झिजवत गेले

...............................................