तीन गझला : सौ. पुष्पा नं. पोरे

 




१.


जरी मोगऱ्याला उराशी धरावे

सुगंधास त्याच्या कसे आवरावे?


तसाही तुझ्या आठवांचाच दरवळ

किती मी स्वतःला कसे सावरावे? 


नको स्पर्श देऊ तरी साथ माझी

अशा या क्षणांनी कुठे मोहरावे?


मनाच्या बगीच्यात तू रोज फुलतो

तुला सांग आता कसे विस्मरावे?


कधी शब्द ओले कधी मौन का हे?

हळू तू सुखाला जसे पांघरावे


जरा ये विसाव्यास विसरू जगाला

जुने तेच काही नव्याने करावे 


प्रकाशाविना का दिसे विश्व पुष्पा?

अता तू मनाच्या गवाक्षी उरावे


२.


तुझ्याविना कळी तिची फुलायचीच राहिली 

जगायची कला तिला शिकायचीच राहिली


जणू मिठीत स्वर्ग हा किती हवा किती नवा 

नकोच आवरू तिला भिजायचीच राहिली


गुलाब तू सुवास तू तुझेच स्वप्न पाहते

अजून रात्रही तिची सरायचीच राहिली


लगा लगा लगा लगा लगावलीस भाळले

कलिंदनंदिनी तरी लिहायचीच राहिली


चितेवरी जरी सख्या तुझीच वाट पाहिली

अखेर पुष्प भेट ही घडायचीच राहिली


३.


माणूस 'मी'पणाचा बंदा गुलाम आहे

संस्कार सभ्यतेला देतो विराम आहे


विश्वास ऐनवेळी विश्वासघात करतो

करते दुरून मीही त्याला सलाम आहे


लंघून सागराला आले तुझ्याचसाठी

ही प्रीत अंतरीची हृदयात ठाम आहे


तोडून मौन सारे घे ना मिठीत लवकर

अर्पण करावया मी आले तमाम आहे


माहोल मैफलीचा का बाधतो तुला हा?

छेडून सूर आता केला निलाम आहे


दुर्भाग्य हे तिचे की तू रूप पाहतो अन् 

लावण्य नर्तिकेच्या नृत्यात धाम आहे


रस्त्यात कृष्णवेडी लावून आस जीवा 

राधेस सांग पुष्पा माझाच श्याम आहे.

...........................................

सौ.पुष्पा नं पोरे

मो.9271622483

No comments:

Post a Comment