१.
वेगळे होते कुठे माझ्यात काही
मी हरवलो वेगळ्या नादात काही
जिंदगी फिरवीत असते रोज वासे
रोज कोसळते मनाच्या आत काही
बोट पकडुन भूक घुटमळते चुल्ह्याशी
काय मिळते.. शोधते मडक्यात काही
वाचनाची भूक मज सांगून गेली
पुस्तके रद्दीतही मिळतात काही
नेहमी का वाटते ती गूढ मजला
ठेवले आहे तिने हृदयात काही
श्वापदे रानामधे नसतात केवळ
माणसांच्या आतही असतात काही
रेटल्यावर जन्म मृत्यूच्या दिशेने
वाटले.. सुटले पुन्हा अर्ध्यात काही
२.
ओंजळ भरून लाच फुलांची वाहत असतो
नंतर आपण झोळी पसरुन मागत असतो
लाख चेहरे चढवत असला चेहरा तरी
खऱ्या रुपाची नोंद आरसा ठेवत असतो
किती सुगंधित झाले असते जगणे अपुले
आपण दोघे या जन्मी जर सोबत असतो
डुबक्या मारत सरून जाते हयात सारी
थांग मनाचा कुठे कुणाला लागत असतो
स्वार्थासाठी खून स्वतःचा करतो आपण
निष्ठेलाही खुंटीवरती टांगत असतो
सदैव गर्दी असते त्याच्या अवती भवती
तो जिभेतून इतकी साखर पेरत असतो
विपक्ष म्हणजे विरोधातला असा इरेझर
जो सत्तेचा हरेक मुद्दा खोडत असतो
३.
बिघडलो जरासा सुधारा मला
तिचे नाव घेउन पुकारा मला
पुन्हा श्रावणी आज सरसर तिची
पुन्हा आज फुटला पिसारा मला
मला खूळ लागेलसे वाटते
तिने आज केला इशारा मला
तिच्या आठवांची नशा रात्रभर
पुन्हा तोच द्या रे उतारा मला
तिचे हात नाजुक फुलासारखे
जरा काळजीने चितारा मला
तिला ऐकल्यावर बरे वाटते
कसे वाटते ते विचारा मला
तिच्या काळजाच्या शिवारात मी
नको वेगळा सातबारा मला
...........................................
नरेंद्र पाटील, धुळे
८६६८९३२४४६
No comments:
Post a Comment