१.
देह झाल्यागत खकाना वाटतो
आत माझ्या कारखाना वाटतो
ठेवला हातात त्यांच्या बाहुला
लेकरांना तो खजाना वाटतो
ठासल्या डोक्यात माझ्या वंचना
का तुला मी बारदाना वाटतो
मी जसा आहे तसा, मग यामुळे
वेडपट सारा जमाना वाटतो
ती अचानक भेटली, आनंदलो
भेटला मोसम सुहाना वाटतो
तू मला बडवून जातो, काय मी
तीन तिरकिट तुम तनाना वाटतो
बोलतो गझलेत नंदा दुःख पण
तू जगाला शायराना वाटतो
२.
वारी नको कुणाची दारात बाप विठ्ठल
पुंडरिक पंढरीचा साक्षात बाप विठ्ठल
जगण्यात संकटाची येता घरात बाधा
घेतोय संकटाला पदरात बाप विठ्ठल
कळले अभंग नाही भावार्थ कीर्तनाचे
गातो तरी मजेने शेतात बाप विठ्ठल
वाणी मधाळ हसणे हृदयात प्रेम ज्याच्या
बुक्का गुलाल चंदन देहात बाप विठ्ठल
झुकला कधीच नाही पायाशि पत्थराच्या
आदर्श मात्र ठरला गावात बाप विठ्ठल
हिंसा नसे कुणाची सत्यास जागणारा
मैत्रेय भाव जपतो हृदयात बाप विठ्ठल
दारी भुक्यास देतो पोटास घास ठरतो
वारस तथागताचा कर्मात बाप विठ्ठल
३.
कुणाच्या श्रमावर कुणाची शिदोरी
युगे चालली ही निरंतर मुजोरी
हवी पापमुक्ती करा दानधर्मा
कुण्या माणसाची कला ही अघोरी
कुणी ठोकरावे कुणी घाव द्यावे
उभा जन्म माझा असावा लगोरी
नको जीव लावू मुली तू उन्हावर
तुझा देह आहे निरागस बिलोरी
इथे मान्य झाली रिती ही जगाची
सदाचार रात्री, उजेडात चोरी
जळे संशयाच्या निखाऱ्यात चंदा
कुठे लुप्त झाली असावी चकोरी
जरी बैल ठरलो जमान्यात नंदा
मला घास कोठे मिळाला पिठोरी
…...............….........................
No comments:
Post a Comment