१.
शब्दांत वेदनेचा उपचार शोधला
गझलेत ह्या सदा मी आधार शोधला
होता शिजत नवा कट त्याच्या मनामधे
त्याने नवा बरोबर लाचार शोधला
मैत्री मनात नव्हती ना वैर कोठले
ठरवून मी इथे ना शेजार शोधला
गगनात मीच माझ्या ही झेप घेतली
माझ्यात शेवटी मी विस्तार शोधला
नाही उगाच झाली मूर्ती सुरेख ही
दगडात ह्या अगोदर आकार शोधला
नव्हता इलाज दुसरा मरणा तुझ्यावरी
मीही नवा जगाया आजार शोधला.
२.
हालते ठेवले पंखाला पुन्हा पुन्हा
दिली उभारी ह्या जन्माला पुन्हा पुन्हा
जातो अखेर वळणावरती वरचेवर
प्रेम शिकवतो मी रागाला पुन्हा पुन्हा
जन्म एकटा माणसा तुझा कबूल पण
गरज कुणाची का मरणाला पुन्हा पुन्हा
नसे पुरे ही शपथ कालची तुझाच मी
हवी खातरी ह्या प्रेमाला पुन्हा पुन्हा
गुमान कोठे कबूल केली ही दुःखे
धरले धारेवर दैवाला पुन्हा पुन्हा
चिंता नाही प्रश्न उत्तरांची नंतर
त्रास कोठला ह्या मौनाला पुन्हा पुन्हा
३.
टाकले किती वचनाने पेचात पुन्हा
कशी करू मी सांग नवी सुरुवात पुन्हा
देणार काय देऊन मला तू दैवा
दान मागतो काट्यांचे पदरात पुन्हा
तुटत एकेक धागा गेला स्नेहाचा
विकास झाला बाकीही वेगात पुन्हा
फुटले डोळे विश्वासाचे उगाच ना
हवा सोडली शंकेने कानात पुन्हा
काय उकळले सांगू ह्या आयुष्याने
काय गवसले सांगू ह्या मरणात पुन्हा
..............................................
श्रीराम गिरी, बीड मो.८२७५७९९०१५
No comments:
Post a Comment