तीन गझला : साै.शशिकला बनकर

 



१. 


पूर्वी होती तशीच आहे अजून मैत्री

खांद्यावरती हात ठेवते हसून मैत्री 


सुविचारांच्या तारा जुळता, जुळले नाते 

कधीच नाही केली आम्ही ठरवून मैत्री


विश्वासाचा भक्कम पाया रचला होता 

उंच इमारत झाली आहे म्हणून मैत्री 


अनेक वर्षे भेटी-गाठी होत नाहीत

आनंदाची उधळण करते दुरून मैत्री 

 

काळजातल्या ओल्याव्याचा सुगंध येतो 

वाट पहाते, स्वागत करते सजून मैत्री 


उत्साहाच्या लाटांवरती बसते मैत्री 

सदैव देते उर्जा स्पर्शामधून मैत्री 


संकटकाळी गरज असते आधाराची 

हृदय निरोगी झाले माझे करून मैत्री 


२.


एकदा तर या सुखांनो दुःख हल्ली फार आहे 

स्वागताला सज्ज माझे मोडलेले दार आहे 


वाद टाळा मौन पाळा भांडणाचा भार आहे 

शांततेतच साठलेले जीवनाचे सार आहे


पाच वेळा लावलेल्या पावडरचा रंग गेला 

चेहऱ्यावरचा तजेला छानसा शृंगार आहे 


काल आलेल्या पुराने सर्व काही नष्ट केले 

जीवघेणा पावसाळा संपला संसार आहे 


तेज आहे लोचनांचे की हुशारी अंतरंगी 

धार दिसते, रोखलेली नजर की तलवार आहे 


३. 


बातम्यांना ऐकताना त्रास होतो 

माणसांचा रोज हल्ली ऱ्हास होतो 


थंड झाली माय धरणी पावसाने 

पावसाळा गारव्याचा दास होतो 


जाणुनी घे सुख समाधानात आहे 

मागण्यांचा कैकदा हव्यास होतो 


बोलताना नेमके बोलून जावे 

गैरसमजाचा कधीही त्रास होतो


संकटांशी झुंजताना हात देतो 

मित्र तेव्हा तोच माझा खास होतो 


ऑक्सिजनची पातळी घटता अचानक 

अमृतासम घेतलेला श्वास होतो 


मोगऱ्याला माळले मी सांजवेळी

साजनाला अत्तराचा भास होतो 

..............................................

1 comment: