तीन गझला : बापू दासरी

 



 

१.


बापाचा अर्थ कळाया जन्माचे थिजले डोळे

त्यागाचा देह चितेवर सरणाचे रडले डोळे


अस्थींच्या आत जळाले भोगाचे शाप निराळे

बाबा या हाकेसाठी बाबाचे शिणले  डोळे


बाबाच्या झिजत्या देही आईची तगमग वाढे

खस्तांची नाव बुडाली कष्टाचे विझले डोळे


भिडण्याची ताकद मोठी मरणाची धास्ती नाही

जगण्याच्या सीमेवरती बाबाचे लढले डोळे


खांद्यावर थोपटताना बापाच्या‌ बाळ उराशी

पोराच्या वाटेवर मग त्याने अंथरले डोळे


२.


दिवे लागणी होण्याआधी मिटले अंतर

ती आल्याने उजेड होतो हे प्रत्यंतर


ती बहराला साजणवेळा बनवत येते

मिठीत फुलती रोमांचाच्या बागा नंतर


दार उघडता, जीव हरखतो, कळी उमलते

ओठांवरती ओठ गिरवती धुंद निरंतर


रुसवे-फुगवे क्षणात मिटती ती हसल्यावर

कारुण्याचे औत्सुक्याचे हे स्थित्यंतर .


आठवताना विसरायाचे भान हरवले

आठवलेले उमजत गेले जंतर-मंतर.  


३.


खपली म्हणजे दुःखावरची साय असावी 

त्यातच दडली आत व्रणांची माय असावी


सुरी फिरवता आक्रोशाचा वणवा उठला 

म्हणे वासरू हंबरणारी गाय असावी


गांभीर्याची बाब अचानक गौण कशी हो?

वार्तांकन? छे! उलटीसुलटी राय असावी


दिव्यांगाला हळू चालणे शिकवत आहे

आई नुसती आई नसते पाय असावी


दारावरती येतच नाही भिक्षूक हल्ली

भिकेस लागत काय कुणाची हाय असावी?

..............................................

No comments:

Post a Comment