तीन गझला : दिवाकर जोशी

 




१.


जीवघेणे खूळ शोधत राहिलो 

मी व्यथेचे मूळ शोधत राहिलो


शुद्धतेच्या फक्त होत्या वल्गना 

मी उगाचच कूळ शोधत राहिलो


एक मूर्ती यायची स्वप्नामधे

मी तिचे देऊळ शोधत राहिलो


चढ उताराची सवय होती कुठे?

मी समांतर रूळ शोधत राहिलो


कोठुनी डोक्यात मुंग्या यायच्या 

नेमके वारूळ शोधत राहिलो


द्रौपदीचे सत्त्व पडताळायला

चहुकडे जांभूळ शोधत राहिलो


पाहिल्या कित्येक बागा देखण्या 

पण तिथे बाभूळ शोधत राहिलो


चेहरा माझाच होता माखला

आरशावर धूळ शोधत राहिलो


दाखला उलट्या जगाचा द्यायला 

एक वटवाघूळ शोधत राहिलो 


२.


अशा कोणत्या साच्यामध्ये घडलो होतो

केवळ एका टिचकीने मी तुटलो होतो


'चुकून'सुद्धा कोणाला सापडलो नाही 

मी आईच्या पदरामागे लपलो होतो


तिथेच होता आसपास शेवटचा थांबा 

तिथून आपण का माघारी फिरलो होतो


मावळतीला जरा कुठे शुद्धीवर आलो 

मी मोहाच्या झाडाखाली बसलो होतो


कधीच माझे डोके मी वापरले नाही 

म्हणून त्याचा भक्त लाडका बनलो होतो


कसा अडकलो गर्तेमध्ये कळले नाही 

मी डोहाच्या निश्चलतेला भुललो होतो


खूप उशीरा मला कळाली माझी दुनिया 

इथून मागे नको तिथे मी रमलो होतो


३. 


उत्क्रांत श्वापदांच्या काळात पोचलो मी

कुठल्या अराजकाच्या दारात पोचलो मी


जाऊ कुठे कशाला शोधात संस्कृतीच्या

आदीम माणसांच्या तांड्यात पोचलो मी


माझ्या उथळपणाची पिटवू नका दवंडी 

ओढ्यामधून आता डोहात पोचलो मी


आता उलट दिशेला वळणे अशक्य माझे 

बहुधा बिजागरीच्या सांध्यात पोचलो मी


माझ्यासमोर नव्हता पर्यायही सुपाचा 

पोत्यामधून अलगद जात्यात पोचलो मी


माझ्या मुशाफिरीला फुटल्या अनंत वाटा

माथ्याकडून जेंव्हा पायात पोचलो मी


ठरवून खूप काही गावाकडे निघालो 

पण वाटले तिथेही शहरात पोचलो मी

...............…...........................

No comments:

Post a Comment