दोन गझला : डॉ. यशवंत मस्के

 


 


१.


हो नव्याने गड नवा बांधायचा आहे मला

एक शिवबा हर घडी घडवायचा आहे मला


जर बळीला गाडणारा भेटला कोणी अता 

त्यास धडधड एकदा रडवायचा आहे मला


कोथळा काढा दुहीचा माजली जी अंतरी 

मावळा सगळा पुन्हा जोडायचा आहे मला


धर्मजातीचा जुना तोडून टाका पिंजरा

हा थवा समता-नभी उडवायचा आहे मला


सोड गप्पा जोड राजा तू अता इथल्या नद्या

माळरानावर मळा फुलवायचा आहे मला


जग बदलणारे प्रभावी शस्त्र हाती घेउनी 

घाव जुलमावर पुन्हा घालायचा आहे मला


पाखरे जगभर पसरली पिंपळावरची जुन्या

आज पिंपळपार तो सजवायचा आहे मला


२.


खोटा म्हणे खऱ्याचा सांघात बंद करतो 

आवाज लेखणीचा झटक्यात बंद करतो


होऊ नये कुणीही माझ्याशिवाय राजा

सरताज गारद्याच्या विळख्यात बंद करतो


टाकून चार दाणे होईल काय दाता?

जो पारधी थव्याला जाळ्यात बंद करतो


खेळात सर्कशीच्या विदुषक धमाल करतो

गिरगिट धरून सारे झबल्यात बंद करतो


वाचा म्हणून देती ही पुस्तके दवंडी

मेंदू परंतु मी का खोक्यात बंद करतो?


लब्बाड लांडगा तो भलतेच ढोंग करतो

शेळीस सोंग करुनी लग्नात बंद करतो


यशवंत फारसे ना बोलून दावतो ज्या

त्या भावनेस अपुल्या काव्यात बंद करतो

..............................................

No comments:

Post a Comment