तीन गझला : पंकजकुमार ठोंबरे

 




१.


साहसाने नाविका तू वादळांशी युद्ध कर 

गर्जणाऱ्या तेजणाऱ्या तू विजांशी युद्ध कर 


सोसवेना दुःख आता हो जरा खंबीर तू 

सांजवेळी वाहणाऱ्या आसवांशी युद्ध कर 


फोड सारे बांध आता तू मनाचे एकदा 

साचलेल्या दाटलेल्या भावनांशी युद्ध कर 


प्राण माझा मागणारी माणसे रक्तातली

माधवाने बोध केला आपल्यांशी युद्ध कर


नाटकाचा खेळ आहे रंगलेला चांगला 

भावनांशी खेळणाऱ्या बाहुल्यांशी युद्ध कर


रेशमाच्या बंधनाला साजणीने तोडले 

काळजाला जाळणाऱ्या आठवांशी युद्ध कर 


साथ माझी सोडली अंधार झाल्यावर तुम्ही 

सोबतीने चालणाऱ्या सावल्यांशी युद्ध कर


२.


आली कधीच नाही तांड्यात लोकशाही

आई मला कळेना वर्गात लोकशाही


नाही मुळीच किंमत राजा तुझ्या मताला

झाला लिलाव विकली पैशात लोकशाही


ना रोजगार-धंदा जगणे महाग झाले

कष्टास भाव नाही कर्जात लोकशाही


अन्याय होत आहे बोलू नकोस काही

बंदिस्त होत आहे ठाण्यात लोकशाही


कंत्राट पास झाले व्यापार शिक्षणाचा

श्रीमंत माणसांच्या नोटात लोकशाही


३.


युद्धात माणसांचा संहार पहिला मी 

साक्षात वेदनांचा बाजार पाहिला मी 


लावू इथे कशाला मी दीप जीवनाचा 

सूर्यापुढेच मोठा अंधार पाहिला मी 


आधार माणसांना मागू कसा कळेना

दैत्यात मानवाचा अवतार पहिला मी 


जीवन स्मशान झाले युद्धात आज माझे 

 स्फोटात पेटताना संसार पाहिला मी


शिष्यास काय सांगू आदर्श शांततेचे 

शाळेतही रणाचा अंगार पहिला मी 


हाका कुणास मारू फैरीत बंदुकींच्या 

आकांत जीवनाचा लाचार पहिला मी 


देहात प्राण असता अपमान खूप झाला

सरणात पेटताना सत्कार पहिला मी 

...............................................

पंकजकुमार उत्तम ठोंबरे

नीलकमल बिल्डिंग,पितांबर महाराज मंदिराजवळ मु.पो.कोंडोली ता. मानोरा जि. वाशिम 444404

मो. 9503717255


No comments:

Post a Comment