तीन गझला : सौ.निशा चौसाळकर

 




१.


गाठायाचे काय नेमके समजत नाही

आकांक्षांचे ओझे काही संपत नाही


पंख लावुनी उडून झाले अवकाशीही

चंद्र गाठला ... मात्र चांदणी गवसत नाही 


अहंभाव मी एकटीच का त्यागू कायम

अभिमानाला जागा नंतर राहत नाही


दिसते कोठे बारिक रेषा नात्यांमधली

चुकून सुद्धा  लांघुन सीमा चालत नाही


आठवणींच्या पाचोळ्याचे खत केले मी  

त्याविण माझे हृदय जराही बहरत नाही


नशिबाचा का खेळ म्हणावा 'जुगार'  आपण

कर्म आपुले दान चुकीचे टाकत नाही


डोहामधला तरंग आहे मी छोटासा

थांग कुणाला सहसा माझा लागत नाही 


मी मोहाच्या झाडाखाली उभी राहते

पण मोहाची फुले कधीही चाखत नाही


पुस्तकातले गुलाब गेले सुकून आता

'निशा' तरी ती भेट गुलाबी विसरत नाही



२.


वृक्ष झाले मी, मुळे मातीत सारी गाडली

पाळले मी मौन अन् पारास चौकट मानली


आपले करतात कायम घात हे मी ऐकते

त्यात असते घातकी तर 'मी'पणाची सावली


कामनांची वृक्षवल्ली केवढी फोफावली

मोहबीजे अंतरी नक्की असावी पेरली


होत गेले गाव माझे आधुनिक  मोठे शहर

पण अचानक माणसे नंतर हरवली  चांगली


हारली असली जरी शर्यत सशाने एकदा

त्यामुळे नाही गती त्याची कधीही खुंटली


३.


विषण्णतेचे डोहामध्ये तरंग उठले होते

मनोरथांनी अखेर बहुधा श्वास सोडले होते


वार्धक्याने वाकावे मी वयस्क इतकी नाही

ओझे त्यांनी आकांक्षांचे फार लादले होते


वैभव गेले, वाडा झाला पोकळ वासा आता

उंबऱ्यातल्या वृद्धत्वाचे मन करकरले होते


वळणावरती थबकत होते सवयीने मी कायम

ओळखणारे वळणावरचे दार हरवले होते


वेलीवरती माया करुनी चूक तरूने केली

विळख्यामध्ये तिने स्वतःच्या त्यास घेरले होते

...............................................

No comments:

Post a Comment