तीन गझला : स्नेहलता झरकर - अंदुरे

 






१.


संकटांनी घेरलेला काळ मित्रा

रात्र वैऱ्याची जरा सांभाळ मित्रा


घातले टाके जरी वस्त्रास माझ्या

कोण शिवतो फाटके आभाळ मित्रा


आग विझते शिंपता पाणी जरासे

का न विझला मग भुकेचा जाळ मित्रा


वाटते सर्वांत मी श्रीमंत आहे

वाढला नात्यांतला दुष्काळ मित्रा


गाळल्यावर स्वच्छ होते सर्व काही

साचला नात्यांत आहे गाळ मित्रा


पोसण्या घरदार ती बाहेर पडली

अन् तिच्या पायात दिसले चाळ मित्रा


त्याच त्या दुःखास का दळतोस रोजच

वेदनेलाही  जरा कुरवाळ मित्रा


२.


राहते साचून सारे काळजावर

का नसावे येत सारे कागदावर


चोच देतो तोच चारा देत असतो

का खरे मानू उपाशी ठेवल्यावर


एकटेपण राहिले नाही जराही

एकदा माझे मला मी भेटल्यावर


शाश्वती नाही मला जर आजचीही

काय ठेवावा भरोसा मी उद्यावर


राहिले नाहीच कौतुक चांदण्यांचे

काजवे जवळून थोडे पाहिल्यावर


३.


भाव शब्दांतला कळत नाही

अर्थ मौनातला लपत नाही


तेच ते ऐकणे बरे होते

शांतता फार सोसवत नाही


फुंकरी कोरड्या पुरे आता

घाव ओला कधी सुकत नाही


रात्र गंधाळते तुझ्यासाठी

स्वप्न का ते तुला पडत नाही


वैर तर साधले जरी त्यांनी 

ओढ रक्तातली सरत नाही

....….......................................

No comments:

Post a Comment