१.
कुणी छाटला हा पिसारा मनाचा
पुन्हा पेटला का निखारा मनाचा?
कसा वादळाचा कळावा इशारा
कसा दूर गेला किनारा मनाचा
भरोसा कुणाचा धरावा कशाला
कधी साथ देतो सहारा मनाचा
कसा डावा त्यांचा कळेना कुणाला
कसा आवरावा पसारा मनाचा
कशी वेळ आली इथे ही विषारी
मला का कळेना इशारा मनाचा?
कसे मौन माझे मलाही कळेना
कधी व्यक्त होतो नजारा मनाचा
कुणी लक्ष्य नाही कुणी मुक्त नाही
कसा नित्य येथे पहारा मनाचा
२.
हे मनाचे खेळ आता आवरू
ह्या नभाला प्रेमभावे पांघरू
वाकणे येथे मला ना आवडे
एकमेका आदराने सावरू
झाड आता सुन्न झाले सांगते
का असे मग दूर गेले पाखरू?
ह्या तमाची दाट छाया वेढते
तू नको गे! ह्या तमाला घाबरू
माणसाने माणसाशी बोलता
काळजाचे शब्द आता वापरू
साथ आता वादळाची चालतो
धीट झालो मी कशाला गांगरू
पेटवा येथे मशाली दोस्त हो
हे विषारी मूळ आता नांगरू
३.
भेटलीस तू वळणावरती बरे वाटले
जणू सावली माझ्यावरती बरे वाटले
धडपडलो मी कितीक वेळा रस्ता चुकलो
आणलेस तू रस्त्यावरती बरे वाटले
स्वार्थासाठी कधीच नाही धडपड केली
विश्वसलो मी शब्दावरती बरे वाटले
तृषार्त झाले ओठ कितीदा पाणी नाही
मेघ दाटले माथ्यावरती बरे वाटले
देह कुणाचा बर्फ जाहला रस्त्यावरती
वस्त्र टाकले देहावरती बरे वाटले
कुणी कुणाचे नसते मित्रा संकटकाळी
नभ पांघरले पंखावरती बरे वाटले
बंध रेशमी कधीच तुटले कळले नाही
विसावताना सरणावरती बरे वाटले
..….........................................
शांताराम हिवराळे,
पिंपरी,पुणे,
मो.9922937339
No comments:
Post a Comment