तीन गझला : मीना महामुनी

 



१.


जात्यामध्ये ती फिरते

साऱ्यांना तर वाचवते


दुःख झेलते सर्वांचे

होऊन दिवा ती जळते


किती आठवू मी आई

घाव मनीचा ओळखते


घरात नसते ती जेंव्हा

जगात कोणी का नसते


सोपे नसते आईपण

आई झाल्यावर कळते


२.


शंका निघून जाते संवाद साधल्याने

नाते अभंग होते जोडून ठेवल्याने 


आनंद फार झाला जन्मास लेक येता

मी भाग्यवान झाले भगवंत पावल्याने


भांडून घ्या स्वतःशी दुखवू नका कुणाला

वाईट वाटते ना अपशब्द बोलण्याने


नियतीपुढे कुणाचे चालत कधीच नाही

हा काळ थांबतो का मी घट्ट बांधल्याने


हातास काम नाही भोंदूच भक्त झाले

का कोण देव होते? शेंदूर फासल्याने


३.


ओढ नाही राहिलेली माणसाची माणसाला

दुःख सारे सांग आता अंतरीचे विठ्ठलाला


एक दुसऱ्यांची मने कोणास का नाहीत कळली

एकदा बोलून तर हृदयातले बघ आपल्याला


शेणमातीच्या घरातच लेकरे घडली सुसंस्कृत 

वाढल्या क्राँकीट भिंती कोण नाही आसऱ्याला


साधण्याला स्वार्थ प्रत्येकास भलती रोज चिंता

हाव सुटली की विनाशच का ठरावा जीवनाला


जाणल्यावर बुद्ध कळतो जीवनाचा सार थोडा

ग्रंथ सारे वाचल्यावर बोलतो इतिहास त्याला

.............................................

No comments:

Post a Comment