तीन गझला : राहुल नंदकिशोर कुलकर्णी

 



१.


एक वेदना जुनी खुणावते अजूनही

कोणती जखम मला पुकारते अजूनही?


हे कधी सरेल वाट पाहणे तुझे तिचे

जीर्ण पापणी मला विचारते अजूनही


फक्त देह लोचने मिटून गाढ झोपतो

मात्र आठवण तिचीच जागते अजूनही


काय पाहिजे अजून जीव थरथरायला

पाकळी तिला बघून लाजते अजूनही


मी कधीच पापणी मिटून घेतली तरी

तार स्पंदनातली निनादते अजूनही


दार किलकिले करून पाहते जरी मला

पायरी तिची तरी शहारते अजूनही


बोलली मला बघून मात्र काल एवढे

'शंकरास बेलपान वाहते अजूनही'


२.


नकोशी वाटते हल्ली सुन्या दारात रांगोळी

जणू आतून येते आर्तशी निष्पाप  आरोळी


कसे या पान कवितेचे तुला सप्रेम द्यावे मी

तुझ्या प्रत्येक उल्लेखात जर ओलावल्या ओळी


मनाच्या खिन्न पटलावर कधीची भिरभिरत आहे

तुझ्या सुकल्या फुलावरची उपेक्षित एक पाकोळी


पुढे दुःखा तुझी ओळख नकोशी वाटली असती

म्हणूनच टाळली गाथा नि केली फक्त चारोळी


तुझ्यानंतर तुझी पत्रे मला छळणार एकांती

कराया पाहिजे या कोंदणाची एकदा होळी


पुरेसे ठेवले पाणी पुढे डोळ्यांत मी कायम

स्मृतींची राहिली शाबूत तेव्हा जीर्ण मासोळी


तसे तर राहिले नाहीच काही सांगण्याजोगे

खरेतर राहिले आहे तसे भरपूर आजोळी


३.


नवी खपली नव्याने टाळली आपण

जगासाठी जखम गोंजारली आपण


पुन्हा झरणार संततधार डोळ्यांतुन

जुनी पत्रेच जर चुरगाळली आपण


सुखाशी फारकत झाली कधीकाळी

तशी दुःखेच तर कुरवाळली आपण


चितेचा धूर हळहळला पुन्हा म्हणजे

हवीशी एक इच्छा जाळली आपण


गुलामी फक्त काट्यांची कुठे केली?

फुलांची सांत्वने सांभाळली आपण


पुढे तर जिंदगीला वाटुया निष्फळ

तिची जर सत्यता पडताळली आपण

...............................................

No comments:

Post a Comment