१.
जगातली शांती जरा बघावी म्हणतो
मनातली गर्दी कमी करावी म्हणतो
लिहीन माझे भाग्य मी नव्याने भाळी
पुन्हा जुनी संधी मला मिळावी म्हणतो
थकून गेली पावले किती चालावे
उमेद माझी ना कधी थकावी म्हणतो
अशातशा नाहीत फारशा इच्छा पण
जुनी लढाई मी पुन्हा लढावी म्हणतो
मनात माझ्याही खयाल येतो जातो
गजल जराशी वेगळी लिहावी म्हणतो
२.
करावे काय मी केव्हा कधी ना योजले होते
तसेही तेच मी केले मला जे वाटले होते
उडाली पाखरे सारी कुणी ना पाहिले मागे
तरीही प्रेम आईचे कधी ना आटले होते
जरी साधी तिची भाषा जणू काहीच ना घडले
तरी का शब्द माझ्याशी मुक्याने भांडले होते
कितीदा हारलो होतो कधी मी मोजले नाही
उधळले डाव नियतीने नव्याने मांडले होते
जरी अंधारले होते तरी मी थांबलो नाही
विचारांच्या प्रकाशाने जगाला शोधले होते
३.
ना कधी कुणासाठी कोण थांबला होता
हात घेतला हाती तोच आपला होता
वेळही तिची होती डावही तिचा होता
मी शरण तिला जाता खेळ संपला होता
केवढा भरवसा मज संयमावरी माझ्या
पाहता प्रियेला का श्वास वाढला होता?
बाण मारला होता का लपून वालीला?
देव तो जरी होता, धूर्त वागला होता
थंडगार वारा मज झोपवून निजतो पण
आज सोबती माझ्या तोच जागला होता
..........................................
No comments:
Post a Comment