१.
रोजच मी-मी करीत आता मिरवत असतो
जणू स्वतःचा बाजारच तो मांडत असतो
आज स्वतःला त्याने इतके लवचिक केले
ताठ कण्याचा कुणापुढेही वाकत असतो
आड खोदुनी ज्याने पाणी प्राशन केले
थेंबाथेंबाची तो किंमत जाणत असतो
शेवटचे तर ठिकाण अपुले निश्चित आहे
तरी जीव हा किती दिशांना धावत असतो?
येथे ज्याला मोल खऱ्याचे कळले आहे
तो खोट्यावर सदैव तोफा डागत असतो
हातांमधुनी क्षण भाग्याचे जरी निसटले
एखादा क्षण चिमटीमध्ये पकडत असतो
मनास माझ्या जर विरहाचा विळखा पडला
चार सुखाच्या आठवांत मी विहरत असतो
२.
इच्छा पतंग होउन माझी नभात गेली
अन् कापण्यास धागा गरिबी क्षणात गेली
भटकून चार दारी दुःखे पुन्हा परतली
चुंबून उंबऱ्याला माझ्या घरात गेली
घरट्यात ना परतली ती पाखरे कधीही
पंखात बळ भराया ज्यांच्या हयात गेली
रुतलेत फार काटे बागेत या मला पण
अत्तर मिळावयाची कायम ददात गेली
जाळ्यात सावकारी मी एकदाच फसलो
अन् जिंदगीच माझी सारी ऋणात गेली
आल्या सरी तशा मग ती मोहरून गेली
त्याला मनात घेउन ती पावसात गेली
एका घरी मुलाचे पडलेत बंद ठोके
जेव्हा कुण्या मुलीची वाजत वरात गेली
३.
जाईल का कधी तो शोधावयास वाटा ?
मिळतात जगभराच्या जर सागरास वाटा!
असणार स्वप्न त्याचे दुनियेहुनी निराळे
जर चालतोय इतक्या घातक प्रवास वाटा
तू गाठले यशाला सातत्य संयमाने
होत्या जरी निसरड्या पण चाललास वाटा
ज्याच्या जिवावरी तू हे बांधलेस इमले
त्याचा दिलास का तू कारागिरास वाटा
मी दूरवर तुडवल्या ध्येयास गाठणाऱ्या
अन् शेवटी मिळाल्या ह्या आसपास वाटा
सारे फिरून येती रस्ते तुझ्याच ठायी
मज लागलाय चकवा की भारल्यास वाटा
तोट्यास कारणीभुत केवळ सरीच नव्हत्या
सांगा बळीस ठासुन मागा ढगास वाटा
...............................................
No comments:
Post a Comment