१.
अपेक्षा कोणतीही मी कधीही ठेवली नाही
सुखांनी पाठ त्यानंतर कधीही सोडली नाही
खुले पुस्तक तिला कळले कसे अद्यापही नाही
मनाची प्रत कधी माझ्या तिनेही चाळली नाही
समुद्राला विचारावे कसा बिनधास्त जगतो तो
कला त्याची पसरण्याची कुणाला साधली नाही
मला तू माफ कर दुःखा सुखांनी घेरलो आहे
तुझी मी आत येण्याची व्यवस्था लावली नाही
खुनी मौनास माझ्या या कुणी शब्दांत मांडा रे
मुके राहून मरण्याची प्रथा ही चांगली नाही
अशी उतरायची घाई करावी का प्रवाशाने ?
जिथे नौका किनाऱ्याला बरोबर टेकली नाही
मुळापासून पोखरते अळी स्वार्थी स्वभावाची
विनाशक काम करताना जराही लाजली नाही
२.
बोलणे काल माझे कटू लागले
सत्य आता जगाला पटू लागले
का सही खास शैलीत केलीस तू
बघ धनादेश खोटे वटू लागले
तूच उद्धार केलास माझा खरा
आज माझे दिवस पालटू लागले
येत नाही कुणीही पुढे आपला
मार्ग सारेच मागे हटू लागले
मारल्या जात नाही अहिंसा तुझी
मारण्याला किती झटपटू लागले
तू समजलास नाणे स्वतःचे खरे
मूल्य हल्ली तुझेही घटू लागले
लांच्छने लावली काल खोटी तुला
आजही तेच पाढे रटू लागले
३.
सांगतो साऱ्या जगाला क्रूस आहे
ईश्वराची आकृती माणूस आहे
घातले जन्मास त्याने माणसाला
घेतली उजवून त्याने कूस आहे
सांगते विज्ञान होऊ दे चिकित्सा
अंधश्रद्धा घालते धुडगूस आहे
घ्यायची आहे ठरव बाजू कुणाची
सोबती सापासवे मुंगूस आहे
श्रेय वातीला मिळावे तेवल्यावर
जाळल्या जातो तुझा कापूस आहे
कोण इतुकी खोल पोखरते मनाला
शोध घेऊ वाळवी की घूस आहे
केवढा लाचार तू दिसतोस देवा
लावली त्यांनी तुलाही फूस आहे
...........…................................
नारायण किसनराव सुरंदसे,
'कुमारेश' धामणगाव रेल्वे,
जि. अमरावती

No comments:
Post a Comment