तीन गझला : लता मुकुंद

 




१.


आई झाल्यावरती मजला कळली माझी आई 

कळल्यावरती आईला गहिवरली माझी आई 


जरी फाटका, स्वच्छ तियेच्या संस्कारी संसारी 

कुशीत मी अन् खुशीत ती वावरली माझी आई 


अता घराच्या सुखास गोडी बहुधा आली कारण 

कष्टामध्ये साखरगत विरघळली माझी आई


संकटात मज सावरायला माझ्या पाठी कायम

गहिऱ्या दुःखातून किती सावरली माझी आई


नव्या जगाच्या, नव्या कल्पना जरी न ठाव्या तिजला

कधी न झाले असे, जीवनी हरली माझी आई


माझी मुलगी म्हणावयास्तव 'अशीच' माझी आई

दरवळते मी रोज जशी दरवळली माझी आई


हयात नाही बाबा आता मायबापही आई

'विठ्ठल' माझा म्हणता तू... घुटमळली माझी आई


चारधाम जे केले त्यावर लिहायला मी बसले 

गझलेमधुनी माझ्या मग अवतरली माझी आई


२.


सोबती तू आज म्हणुनी गूज सारे सांगते 

एरवी मी भावनांना आत माझ्या कोंडते 


बांधलेली मी किनारी बंधनाच्या केवढी

साथ मिळता सागराची बांध माझे मोडते


सांजवेळी भेट अपुली होतसे  क्षितिजावरी

सांगणे पण  होत नाही अंतरी जे साचते


ध्येय माझे एवढे तू जा पुढे  जितके हवे

तू पतंगासारखा मी दोर मागे वाटते


जीवनाच्या या घडीवर आज मी आहे उभी

राग अन् अनुराग दोन्ही सारखे मी मानते


३.


रुसायचेही हसायचेही 

फुलावरी मन बसायचेही 


मनास नव्हते विकार जोवर 

खुलेच जीवन असायचेही 


भ्रमात नव्हत्या विचारधारा 

विचार पक्के ठसायचेही


शुभंकरोती म्हणून कोणी 

लहानपण ते कसायचेही


कमाल भपका तशीच झगमग 

उगी दिखावे नसायचेही


खरंच नाटक अशात वाटे

अताअताचे फसायचेही

...............................................

No comments:

Post a Comment