तीन गझला : शीतल कर्णेवार

 




१.


सुटले नाही कधीच ज्या कोड्याचे उत्तर

दिली सोडुनी मीही चर्चा  त्या प्रश्नावर


होतच असते नकळत चर्चा वाद अकारण

तू दिसल्यावर कसे करावे मी विषयांतर


विषय नेहमी प्रेमाचा मी जरी बदलला

सदैव असतो मनात माझ्या तुझाच वावर


जमेल तितके असेल सोबत तुझ्या अरे, पण

मी नसल्यावर आठवणींना अंथर पांघर


रडता-रडता हसवित जाते आयुष्याला

जीवन म्हणजे खरेच आहे जंतरमंतर


पडले उठले पुन्हा धावले जगण्यासाठी

संघर्षाच्या चित्रपटाचे कर मध्यांतर


फार एकटे वाटायाचे मला अगोदर

गझल भेटली माझ्यामध्ये नंतर नंतर


२.


दोन किनारे प्रेमामध्ये असल्यावरती जळणे कळते

या हृदयाचे त्या हृदयाला उगाच का तडफडणे कळते


लेक सुखाने हसण्यासाठी रोज उन्हाशी लढते तेव्हा 

तळहाताचे चटके आणिक जात्यावरचे दळणे कळते


चाफ्यासाठी किती विनवण्या रुसणेफुगणे घरी चालले

अंगणातल्या तुळशीलाही हसणे अन् विरघळणे कळते 


बोट धरूनी उभे राहिले कळली नाही किंमत तेव्हा 

ठेच लागता गर्दीमध्ये त्या हाताचे नसणे कळते

 

वात एकटी फडफडल्यावर, थरथरल्यावर मला अचानक 

हव्याहव्याशा एकाकी एकांताचे अनुभवणे कळते


तू तू मी मी करता करता निसटुन जातो क्षण सोनेरी 

वेळच नसते जगण्याला अन् सुखदुःखाशी जुळणे कळते


३.


केवढे भावते वेगळेपण मला

सादगी दे तुझी आज आंदण मला 


भेटुनी लोटले एक तप बघ तुला 

का तरी बिलगतो तोच श्रावण मला


भेटले चांदणे अन् कुणाला फुले

रोजची धावपळ रोज वणवण मला


काय झाला गुन्हा स्त्री म्हणोनी इथे 

सारखा समजतो एक अडचण मला


कालही मागले आजही मागते 

कर कधी मोगरा फक्त अर्पण मला

...............................................

No comments:

Post a Comment