१.
तोल सांभाळून रस्ता पार केला
एकदा नाहीच वारंवार केला
द्या पुन्हा काटेकुटे वाट्यास माझ्या
सोसण्याचा धर्म अंगीकार केला
मी पसंतीला तुझ्या यावेच म्हणुनी
मी बदल अपुल्यात थोडाफार केला
फूस लावुन सूर्यही अस्तास नेला
अन् उजेडाच्या घरी अंधार केला
ठेवले वर्मावरी बोटास ज्याने
त्याच व्यक्तीचा जगी धिक्कार केला
२.
गळ्याला बांध ना धागा रिकामा चांगला नाही
कसा अजुनी गडे मासा गळाला लाभला नाही
बहाने व्यर्थ हे सारे कशाला सांगते पोरी
तुझ्या परसातला चाफा कसा गंधाळला नाही
किती नाजूक आहे तू सखे साजूक आहे तू
कळेना का? तुझ्या नादी कुणीही लागला नाही
जराशी कर गडे घाई धिराई चांगली नाही
कुणासाठी कधीही हा जमाना थांबला नाही
हवे तर नाव घे माझे मनाई ना तुला माझी
कुणाचा एकटा गाडा कधीही चालला नाही
मला बदनाम करण्याला किती आरोप माझ्यावर
कधीही हात मी कुठल्या फुलाचा दाबला नाही
३.
दोन फाशांच्या जणू खेळात मी
वेदनेच्या खोलगट डोहात मी
स्पष्ट केव्हांही न आले बोलता
कातिणीने वेढल्या जाळ्यात मी
तू उगाचच मज कुठे शोधू नको
प्रेक्षकांच्या वाजत्या टाळ्यात मी
केरकचरा मी जरी नसलो तरी
का बरे खुपतो कुण्या डोळ्यात मी
त्या हृदयस्पर्शी प्रसंगाला बघा
रोज ज्या असतो मुलाबाळात मी
उंबरा ओलांडला नव्हता कधी
पण तरीही ओढलो वादात मी
..............................................
जयप्रकाश सोनूरकर
मो.९७६५५४७९४०
No comments:
Post a Comment