तीन गझला : शीला टाकळकर

 



१.


काय ठेवले, कुठे ठेवले, मीच ठेवले, स्मरू किती !

रोजरोजची एकटीच मी आवरसावर करू किती !


साठीनंतर साथ सोडती अवयव  सारे असे कसे?

मेंदूचाही रांजण गळका पळीपळीने, भरू किती!


कलप लावुनी केसांना मी, फ्राॅक घातला नवा जरी 

आजोबाही, आज्जी म्हणती, राग मनावर धरू किती!


"सुंदर दिसता आजही तुम्ही, वाटत नाही साठीच्या"

उपहास तरी का मोहरते, मूर्ख अशी मी ठरू किती!


नट्टापट्टा करून मीही, ठेका धरते नृत्याचा

सेल्फीवरही सुखावणारी 

माझ्यावर मी मरू किती


२.


कसे वाद गेले उगाचच थराला 

किती एकटी मी पुजू या वडाला 


जशा चार भिंती घराला मिळाल्या 

हमी देत गेल्या सदा त्या छताला 


बुजवते जरी भेग दिसते पुन्हा ती 

कितीदा गिलावा करू या घराला


घरी वाढल्या ज्या तुझ्या येरझारा 

मिळालीच पुष्टी तशी संशयाला 


सहज सांडला हो जरा भात येथे

निमंत्रण मिळाले म्हणे त्या भुताला


३.


पाठीमागे तुझ्या नेहमी रांगत गेले

अडखळणारे पाय तुझे सांभाळत गेले


भले-बुरे ते वेळेवरती सांगितले मी 

दीड शहाणी लोक मला संबोधत गेले


मागे वळुनी अवलोकन मी केले माझे 

अन् घडलेल्या चुका पुढे मी टाळत गेले


रित्या ओंजळी झाल्या माझ्या नुरले काही 

आयुष्या मी तुझ्या मागण्या पुरवत गेले


फार चुकीचा आहे 'शीला' मार्ग बदल तू 

धडा शिकविला त्या काट्यांना पूजत गेले

.............................................

No comments:

Post a Comment