तीन गझला : आनंद पेंढरकर

 




१.


झेलायाचे दुनियेला तर कातळ बनणे आले 

विस्तव आयुष्याचा तळहातावर जपणे आले 


जुळण्याआधी, जुळल्यावर वा नाते तुटल्यानंतर 

एका एका भेटीसाठी अखंड झुरणे आले 


"सोडू नकोस हात" म्हणाली ती अजिजीने जेव्हा 

ती सोडणार नाही याची खात्री धरणे आले 


फांदीची ही सवय शेवटी हात सोडुनी देणे 

फूल व्हायचे तर सांजेला मुकाट गळणे आले 


विदुषक आहे म्हणून केवळ हसणे मिरवत गेलो

आड मुखवट्याच्या कितीकदा मुकेच झरणे आले 


नास्तिक आहे म्हणून झुकणे तत्त्वांमध्ये नाही 

तरी सुप्त इच्छेच्या पायी पाया पडणे आले 


हिशेब इथला इथेच होतो म्हणून तर ही वणवण 

इतकी पापे फेडायाची म्हणजे जगणे आले


२.


कितीकदा फिसकटले निघणे ठरता ठरता

कोरडेच डोळे लोकांचे भरता भरता


कशी निसटली हातुन परडी आठवणींची ?

पुन्हा पसरल्या घरभर गोळा करता करता


तुझ्या खुणांची कातरकाळी सांज दाटता

साकळतो डोळयांत पाऊस झरता झरता 


अश्रूंचा पडदा आला डोळ्यांवर हलका

धूसर झाले दृश्य मिठीचे स्मरता स्मरता 


लाटांवरती दूर जायचा प्रयत्न अविरत 

तुझ्या किनाऱ्यालाच लागतो तरता तरता


एक कवडसा तळव्यावरती झरला होता 

कसा हरवला कौलांमध्ये धरता धरता ?


शेवटच्या चेंडूवर बसतो षटकार कधी 

पदक अचानक गळ्यात पडते हरता हरता 


डोक्यावरती हात एक अदृश्य असावा 

कुणामुळे मी वाचत गेलो मरता मरता ?


श्वास थांबण्याआधी यावी चाहूल तुझी 

पुन्हा नव्याने घेईन जन्म सरता सरता 


३.


जगलो येथे मीही, जगलो म्हणण्यापुरता 

फक्त जमवला लाकुडफाटा जळण्यापुरता 


कधीच झाला गहाळ आत्मा देहामधुनी

तरी चेहरा आहे जपला हसण्यापुरता 


चाल सुखाच्या कवितेला लागलीच नाही 

सूर मिळाला दुःखाला गुणगुणण्यापुरता 


इच्छा नाही स्पर्श किनाऱ्याला करण्याची 

श्वास रोखुनी धरला आहे तरण्यापुरता 


नको जिंकवू शर्यत कुठली हात पकडुनी 

फक्त हात दे पडेन तेव्हा उठण्यापुरता 


मुळीच नाही दिसली तळहातावर रेषा 

हात लाभला नुसता कष्ट उपसण्यापुरता 


उगवेन पुन्हा नाजुक एका कोंभामधुनी 

दे चौकोनी खड्डाच मला निजण्यापुरता 


सूर्य कधीचा क्षितिजावरती साकळलेला 

दे हलकासा एकच धक्का बुडण्यापुरता 

...............................................

No comments:

Post a Comment