तीन गझला : बबन धुमाळ





१.


मस्तीमधी जगावे वाटे चिकार मित्रा

माझा खरेच नाही तितका पगार मित्रा


आतून पोखरे मज वय वाढली समस्या

प्रत्येक मागणीला येतो नकार मित्रा


म्हणतो कसा मला जा सोडून मायबापा

माझ्यावरीच आहे त्यांची मदार मित्रा


आयुष्यभर पित्याने गरिबांस दान केले

मागू कसे कुणाला येथे उधार मित्रा


नाही भरू शकत मी माझा पुढील हप्ता

वाळून कोळ झाले सारे शिवार मित्रा


माझ्याच माणसांनी विश्वासघात केला

विसरू कसा बरे मी झाला प्रकार मित्रा


मर्जीनुसार त्यांच्या काढून टाकलेले

मी मोडला जरीही नाही करार मित्रा


२.


लावते चोरायला चतकोर येथे

भूक बनवी माणसाला चोर येथे


पावसाचे फक्त गाणे गायल्या वर

नाचतो रानी कुणाच्या मोर येथे


माणसे समजायची संभाषणाने

टाकला कापून कोणी दोर येथे 


सवय आधी लावतो फुकटेपणाची 

राज्य मग करतो दरोडेखोर येथे 


जो इमानी काळजी करतो उद्याची 

अन् हरामी झोपतो बिनघोर येथे

 

वादळाशी शूर लढतो संयमाने 

पाहुनी संकट रडे कमजोर येथे 


३.


वेड्यांची  संचालक  झाली आहे

विचारसरणी घातक झाली आहे


जरी बोलते साखर मुखातुनी या 

करणी-धरणी मारक झाली आहे 


इतकी भिनली स्वभावात चंचलता 

आनंदाला  रेचक झाली आहे 


शेजारधर्म जरा पाळला होता 

नजर सखीची बोचक झाली आहे 

ना-ना करता गाठभेट  झाल्यावर 

चर्चा साधक-बाधक झाली आहे 


लग्नगाठ ना कधी वाटली बंधन

सखीच माझी तारक झाली आहे 


सदा लावले दिवे प्रार्थना केली 

कुठे सुखाला पाचक झाली आहे 


जसे दिसे तू तसेच वर्णन केले

खरेच कविता मादक झाली आहे


ताकद असते लेखनीत या इतकी 

सखीच माझी वाचक झाली आहे 

.............................................

बबन धुमाळ, 

मो नं 9284846393

No comments:

Post a Comment