१.
मोगऱ्याला माळण्याचा छंद माझा
गंधकोषी राहण्याचा छंद माझा
मज न पर्वा त्या वसंताची जराही
ग्रीष्म पीडा साहण्याचा छंद माझा
मोगऱ्याच्या शुभ्रतेचे खूळ जीवा
अन् जिवाला जाळण्याचा छंद माझा
घाव त्यांनी घातलेले सौम्य होते
आसवांना ढाळण्याचा छंद माझा
त्या सुगंधी केवड्याशी काय नाते?
सर्प जहरी पाळण्याचा छंद माझा
जे हवे ते प्राक्तनाला मान्य नाही
आवडीचे टाळण्याचा छंद माझा
मोगरा वा केवडा अन् सोनचाफा
शाप की गंधाळण्याचा छंद माझा
२.
मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे
गर्द काळ्या त्या तमाला भेदून आले चांदणे
जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा
त्याच गावी आठवांचे ठेवून आले चांदणे
ती किशोरी धीट स्वप्ने गंधाळली तेजाळली
मी दुपारी तप्त सूर्या देऊन आले चांदणे
नेहमी मी मोह फसवे हेटाळले या जीवनी
संशयाचे बीज का हो पेरून आले चांदणे
दूषणे साऱ्या जगाची सोसून मी तारांगणी
पौर्णिमेने ढाळलेले वेचून आले चांदणे
जीवनाचे गीत गाता आसावरी झंकारली
आर्ततेचे सूर सारे छेडून आले चांदणे
तारकांचा गाव आता देतो 'प्रभा' आमंत्रणे
शुभ्र साध्या भावनांचे लेऊन आले चांदणे
३.
केदार अश्रु आज तिथे ढाळतो कसा?
माझाच देव आज मला टाळतो कसा?
मीही झुगारलेत अता बंध कालचे
इतिहास काळजातच गंधाळतो कसा?
देवास काय सांग सखे मागणार मी
माझेच दु:ख देव शिरी माळतो कसा?
अग्नीस सोसतात उमा आणि जानकी
बाईस स्वाभिमान इथे जाळतो कसा?
राखेत गवसतात खुणा नित्य-नेहमी
स्त्रीजन्म अग्निपंखच कुरवाळतो कसा?
मदिरेस लाखदा विष संबोधतात ते
सोमरस नीलकंठ स्वतः गाळतो कसा ?
वैशाख लागताच झळा पोचती 'प्रभा'
सूर्यास सूर्यवंशिय सांभाळतो कसा?
........................…................
No comments:
Post a Comment