तीन गझला : एकनाथ गायकवाड

 



१. 


मी ओळखून आहे सारी जबाबदारी

डोक्यास ताप देते भारी जबाबदारी


ती चालते समोरी होऊन पाठमोरी

होती घरात आता दारी जबाबदारी 


नादावलो जसा की माझ्याच वेदनेला

सौख्यास लाथ तेव्हा मारी जबाबदारी


हातात काम त्याला टाळू तरी कसे मी?

लाडात वाढवावी प्यारी जबाबदारी 


आता कुठे मिळाली खेळावयास संधी 

येते तुझीच आहे बारी जबाबदारी 


तू आळशी तरीही संधी तुलाच देते 

जी संकटात साऱ्या तारी जबाबदारी


तो हारला ससाही जो धावलाच नाही 

त्यालाच धूळ तेव्हा चारी जबाबदारी 


२.


सुखाचे झाड फोफावे कशाला खांडता आता?

क्षणाचे सोबती सारे कशाला भांडता आता


धरावे ओंजळी मोती जपावे मोल त्यांचेही

चुकीच्या आडवाटेला कशाला सांडता आता


दुरावा वाढतो आहे जरी नात्यात मोठ्याने

तुटाया दोर आलेला तरी का तांडता आता


दळाया पाहिजे काही परार्थाचे खरे दाणे

परी स्वार्थास नेमाने कसे ते कांडता आता


खऱ्याला मोल लाभावे असे ना वागते कोणी

जगाला भूल देणारे भुलावे मांडता आता


चराया रान ढोराला तसे ते दान चोराला

गरीबाला फुकाचे का तरीही दांडता आता


वडीलांनी भलाईचे तुम्हा बोलून जे झाले

तरी आज्ञेस मोलाच्या कसे ओलांडता आता


३.


मौनातली शिदोरी खोलू निवांतवेळी

बोलावया हवे ते बोलू निवांतवेळी


भोगावया नको का? वाट्यास येत आहे

भोगून यातनांना डोलू निवांतवेळी


येवोत टोळधाडी ग्रासावयास आता

आपापल्या परीने टोलू निवांतवेळी


मागावयास कोणी येईल खास काही

त्याच्याच अंतराला तोलू निवांतवेळी


 देहावरील ओझे लादून कोण जाता

 एका क्षणात सारे कोलू निवांतवेळी


वाचू मनात सारे साचून राहिलेले

आतील भावनांना सोलू निवांतवेळी 


आता पिऊन घेऊ काढा जरी कडू तो

 दूधात साखरेला घोलू निवांतवेळी


..............................................

एकनाथ गायकवाड 

मो.9421182337

No comments:

Post a Comment