१.
मुक्ततेचा वर जरी आम्हांस आहे लाभला
बंधनाचा दोर कोणी सैल कोठे सोडला?
मी तुझ्या आश्वासनांचा मान होता राखला
शब्द का माझा असा होतास तू हेटाळला?
पुस्तकांचा भार नाही फार मी सांभाळला
माणसाचा चेहरा आहे खुबीने वाचला
मार्ग माझ्या उन्नतीचा या जगाने रोखला
वेगळा रस्ता नव्याने आज आहे शोधला
घाव वर्मी बोलण्याचा फार होता लागला
हुंदका माझा तरी मी संयमाने दाबला
भावनांना बांध माझ्या मी कितीदा घातला
ओघ अश्रूंचा तरी कोठेच नाही थांबला
मी घराचा उंबरा आता कुठे ओलांडला
थेट आभाळात झोका उंच आहे टांगला
२.
संसाराचे व्रत निष्ठेने करत राहिले
क्षणोक्षणी मी नवी भूमिका जगत राहिले
मते स्वतःची स्वतंत्र नाही राखू शकले
कळसूत्री मी फक्त बाहुली बनत राहिले
वरवर हसुनी जगण्याचा मी उत्सव केला
व्रण जखमांचे काळजात पण खुपत राहिले
जरा मनाचे नभ मी होते खुले ठेवले
संशयरूपी नाग जगाचे डसत राहिले
संकटांस मी मानत गेले नवीन संधी
दैवच नंतर पायांपाशी झुकत राहिले
समोर आले वास्तव ते मी कुठे टाळले?
जग स्वप्नांचे हळूहळू मग फुलत राहिले
काळोखाची माया आता विरली सारी
स्वच्छ, मोकळे क्षितिज सुखाचे खुलत राहिले
३.
पोटात एक आहे,ओठांत वेगळे
खेळून धूर्त खेळी, का लोक सोवळे?
ठेवू नकोस अश्रू कोंडून तू कधी
दे भावनांस थोडे आकाश मोकळे
स्पर्धेतल्या यशाची फैलावते हवा
खातात हेलकावे मग जीव कोवळे
ओघात भावनेच्या वाहू नयेस तू
देईल फक्त धोका हे प्रेम आंधळे
न्हाऊ सुखात आता सांजावल्या क्षणी
पाहू नव्या पिढीचे सत्कारसोहळे
.............................................
No comments:
Post a Comment