तीन गझला : विजय जोशी

 




१.


संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई

नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई


संसाराचे सुख चिंतूनी दिवा लावते

मंद तेवते प्रकाश देते जळते आई


सोशिकतेने दु:ख पचवते सदासर्वदा,

कुणा न कळता आत मनातुन रडते आई


आजहि जेव्हा आठवणींची शाळा भरते,

गोठा, अंगण, माजघरातुन दिसते आई


मी न बोलता दु:ख मनाचे अचुक हेरते,

'हेही जातिल दिवस आजचे' म्हणते आई


जेव्हा असतो घरापासुनी दूर एकटा,

असतो पैसा, सर्व सुखे पण नसते आई


ठाव मनाचा तिच्या लागणे कोडे असते,

जेव्हा आई होते मी, उलगडते आई


२.


ऋणात राहू, भार कशाला

मदतीचा व्यापार कशाला ?


मनात नाते सुंदर रुजले

प्रेमाचा बाजार कशाला ?


शब्दांनी बंबाळ करविले

शस्त्राचा मग वार कशाला ?


नशिबी आहे ते स्वीकारा

उगाच चिंता फार कशाला ?


प्रेमाची, लग्नाची आहे

अजून तिसरी नार कशाला ?


वंदन केले भक्तीभावे

पैशाचा व्यवहार कशाला ?


मित्र मोजके नेक चांगले

उगाच भारंभार कशाला ?


'विजो' मांडतो शब्द ताकदी

धारदार तलवार कशाला ?


३.


तोऱ्यात सांगतो मी येथे विकास आहे

वास्तव परिस्थिती की साराच भास आहे 


युद्धास तोंड फुटले खंडर बनून गेले

फिरती शरीर पुतळे, नुसताच श्वास आहे


कर्जात योजनांच्या आशा प्रलोभनांची

'समृद्धि' उंंच जातो, खाली भकास आहे


आहे खरेच इच्छा तळगाळ काम योजू

तिथला समाज वंचित अजुनी उदास आहे


एकादशी, चतुर्थी स्वार्थी तुझा दिखावा

गरिबीत रोज येथे कायम उपास आहे


पैसा नको नि गाडी सत्ता सुद्धा नको ना

या झोपडीत माझ्या आनंदवास आहे 

.............................................

विजो (विजय जोशी),

9892752242

No comments:

Post a Comment