तीन गझला : निलेश कवडे





१.


स्मृतींची तीव्र झाली झळ, तुझ्या गावात आल्यावर

पुन्हा छातीत उठली कळ, तुझ्या गावात आल्यावर


मनाच्या शांत काठावर पुन्हा बेभान लाटांची

अचानक वाढली वर्दळ, तुझ्या गावात आल्यावर


तुझ्यासाठी न आलो पण तुझ्यापाशीच पोहचतो

कसा टाळू तुझा दरवळ, तुझ्या गावात आल्यावर


तुझी जादूच ही, झालो पुन्हा ताजातवाना मी

मनाची संपली मरगळ, तुझ्या गावात आल्यावर


तुझ्या कक्षेत आलो अन् बदल माझ्यात जाणवला

मनावर वाढली हिरवळ, तुझ्या गावात आल्यावर


विसरली सर्व काही की तुला अद्याप आठवतो

समजले हे तरी पुष्कळ, तुझ्या गावात आल्यावर


तसा संबंध नसतो या जगाशी कोणता माझा 

मला जग वाटते प्रेमळ तुझ्या गावात आल्यावर


तुझा उल्लेखही साधा इथे करणार नाही मी

तुझी जपणार मी काजळ तुझ्या गावात आल्यावर


तुझ्या जर बंगल्याची मी चुकीने बेल वाजवली 

तुला झेपेल हे वादळ, तुझ्या गावात आल्यावर


२.


किती ही जीवघेणी होरपळ आहे

तुझे काहीतरी माझ्याजवळ आहे 


जरासा ठेव संयम वाट बघ थोडी

व्यथा काही क्षणांची वावटळ आहे 


विषय अद्याप ना डोक्यातुनी गेला

मनी इतकी सुरू ढवळाढवळ आहे


तुझ्या डोळ्यांत बघताना समजले हे

महासागर वगैरेही उथळ आहे 


कधी नियतीपुढे टिकले कुणी येथे

दिव्याला शेवटी विझणे अटळ आहे


पळुन, पळणार आहेस तू कुठवर 

इथे चुकली कुणाला धावपळ आहे


व्यथा सोसूनही हसतोस जगताना 

तुला इतके कुणाचे पाठबळ आहे


३.


मृत्यू आला माझ्या गझला वाचत बसला

शब्दांमध्ये माझे जीवन शोधत बसला


माणुसकीची सुंदर वेणी गुंफत बसला

या हृदयाला त्या हृदयाशी जोडत बसला


म्हातारा मरणाचे कौतुक करता करता

आयुष्यभराचे गाऱ्हाणे सांगत बसला


माझे नव्हते तरी मला माझेच वाटले

जीव उगाचच मृगजळावरी गुंतत बसला


माझ्यामधला मी चिंता पेटवण्यासाठी 

सिगारेटवर सिगारेट शिलगावत बसला


दुनिया त्याला वेड लागले आहे म्हणते

तो दुनियेला खरे वेड समजावत बसला


नात्यांमध्ये ऊब मिळाली नाही तेव्हा

म्हातारा सूर्याकडे उन्हे मागत बसला

..............................................

No comments:

Post a Comment