'पाऊसधार म्हणजे राज्याभिषेक माझा
माझ्यात एक शापित राजा जिवंत आहे'
अशा अनेक शेरांमधून जनसामान्यांची भावना चपखलपणे व्यक्त करणारे शायर विजय आव्हाड. जालना जिल्ह्यातील माळेगाव या छोट्याशा गावात १५ जुलै १९८१ रोजी जन्माला आलेले, मराठी गझल समृद्ध करणारे एक महत्त्वाचे गझलकार विजय आव्हाड यांचा जन्म झाला.
नियतीने या शायराला संवेदनशील मन आणि अफाट प्रतिभाशक्तीच्या वरदानासोबतच अंधत्वाचा शापही दिला. शास्त्र असे सांगते की मानवाला मिळणाऱ्या एकूण ज्ञानापैकी ८० % ज्ञान हे डोळ्यांपासून मिळते.आपल्याला जे एकूण अनुभव मिळतात, त्यातही डोळ्यांचीच प्रमुख भूमिका असते. पण आव्हाडांची प्रज्ञा आणि प्रतिभाच त्यांचे डोळे बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी याच प्रज्ञाचक्षूच्या साहाय्याने सर्व मर्यादांवर मात करून विजय आव्हाड यांनी आपली प्रगल्भ आणि समृद्ध काव्यशैली निर्माण केली.
'तूच आता एक दीपत्कार केला पाहिजे
चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे'
त्यांच्या या शेराप्रमाणेच त्यांची शिकण्याची इच्छाशक्ती त्यांना बदलापूर येथील 'प्रगती अंध विद्यालयात' घेऊन आली. तेथेच त्यांच्या जीवनात ब्रेल लिपीच्या माध्यमातून अक्षरांचा प्रकाश अवतरला. बालवयातच आईच्या जात्यावरील ओव्या ऐकल्यामुळे दुःखाची, कारुण्याची भाषा आणि लय त्यांच्या अंतर्मनात रुजली होती. कालांतराने ब्रेललीपीतून जीवनाचे तत्त्वज्ञान कागदावर उतरू लागले.
'माणसांच्या सावलीला उन्ह टाळायास आलो
कोणत्या झाडास सांगू मी उन्हाळा अंतरीचा'
जवळच्या व्यक्तीला आपले छोटे मोठे दुःख सांगून ते हलके करू शकतो पण एखाद्या व्यक्तीचं दुःख जर अख्ख्या उन्हाळ्यावढे असेल तर त्याने ते कुणाला सांगावे ? बहुधा ही अपरिहार्यताच त्यांना गझलेकडे घेऊन गेली असावी.
'आग विझलेल्या चुलीची लागली पोटात माझ्या
मी कसा मग सूर काढू फुंकणीतुन बासरीचा?'
आव्हाडांच्या जीवनामध्ये संकटांची कमी नव्हती आणि त्यातून मार्ग काढून आपल्या सृजनाची भूक भागवणे, कलेची जोपासना करणे सोपे नव्हते. कलेची उपासना करताना कोणत्याही कलाकारांच्या समोर येणारी समस्या ते आपल्या शेरातून व्यक्त करतात. फुंकणी, चूल या सामान्य प्रतिमा वापरून आपला आशय निःसंदिग्धपणे पोचवण्यात त्यांचा हातखंडा होता.
आपल्या दुःखाला आपल्या प्रतिभाशक्तीने सुंदर बनवून त्यांना जनसामान्यांच्या ओठावर आणण्यामध्ये आव्हाड यशस्वी होत होते. हलाखीची परिस्थिती, अंधत्व या सर्व संकटांवर मात करून त्यांनी सुरू केलेला गझलेचा देदीप्यमान प्रवास सर्वांनाच अवाक करून टाकणारा होता.
'दिव्य सूर्याने दिला जो आत्मतेजाचा वसा
दीप रक्ताचेच अंधारात जाळू लागलो'
डोळ्याचे तेज गेले तरी दिव्यतेजाचा वसा त्यांना मिळाला होता आणि तोच वसा त्यांनी आपल्या अंधारातही नेटाने चालू ठेवला. त्यांनी स्वतःला गझलेसाठी वाहून घेतले आणि त्यांच्या लेखणीतून एकापेक्षा एक सरस रचना पाझरू लागल्या.
सर्वसामान्य माणूस कविता, गझल लिहिणे याला छंद समजतात पण आव्हाडांसाठी हे लिहिणं नेमकं काय होतं हे ते त्यांच्याच खालील शेरामधून व्यक्त करतात -
'घेतली या अक्षरांनी वेदनेची थोर दीक्षा
ही तपस्या सोसण्याची; छंद नाही शायरीचा!'
त्यांनी शायरीला (गझलेला) सोसण्याची तपस्या म्हटले आहे. संवेदनशील माणूस स्वतःचे दुःख तर सोसत असतोच पण समाजातील इतर घटकांच्या दुःखानेही तो तितकाच व्यथित होत असतो. या अनुभूतीतूनही गझलेचा जन्म होत असतो.
विजय आव्हाड यांची गझल फक्त दुःखाला वाचा फोडून थांबत नाही तर त्यातून मार्ग काढण्यासाठी,बंड करून उठण्यासाठी प्रेरणा देते. तसेच आपल्यामधील सामर्थ्याची ओळखही करून देते.
'संकटे येतात निधड्या काळजावर
खापरावर घण कुणी घालीत नाही'
अशाप्रकारे आव्हाड साध्या सोप्या प्रतिमा वापरून जीवनातील समस्यांचा सकारात्मकपणे उलगडा करतात. संकटे त्यांनाच येतात जे त्यातून मार्ग काढू शकतात. असे साध्या माणसांचे जीवन सुलभ करणारे चिंतन त्यांच्या अनेक शेरांमध्ये पाहायला मिळते.
'बाळ जेव्हा रडे दुधासाठी
त्यास पहिलेच बंड म्हणतो मी'
माणूस हा जन्मतःच बंडखोर वृत्तीचा असतो. न्यायासाठी हक्कासाठी आवाज उठवणारा असतो, हे शाश्वत सत्य या शेरांतून सहजपणे मांडतात. बाळाच्या रडण्यामध्ये बंड पाहण्याची दिव्यदृष्टी लाभलेल्या या अवलियाला अंध कोण म्हणेल.
समाजातील विषमता,गरीब श्रीमंत दरी, व्यवस्था या सर्व बाबींचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या गझलेत पाहायला मिळते. व्यवस्थेवर आसूड उगारताना ते काहीसे आक्रमक झालेलेही आपल्याला पाहायला मिळतात.
'एकीकडे भुकेच्या गोळ्या नव्या नव्या
एकीकडे उपाशी दुष्काळ बेतला'
समाजातील टोकाची विषमता ते सहज साध्य शब्दात मांडतात. त्यांनी गरिबी पाहिली होती. गरीब लोकांचे जीवन जवळून अनुभवले होते.
'नेमकी शाळेत माझी जात कळली
शिक्षणा तेव्हा तुझी औकात कळली'
समता स्थापित करणे हा शिक्षणाचा उद्देश असला तरी शिक्षण घेत असतानाच जातीचा उल्लेख केला जातो. दाखल्यावरची ओळख ही जात आणि धर्मानुसारच होते. आज शिक्षण, नोकरी या बाबींमुळे जातभावना तीव्र झाल्याचे आपण पाहतो. ते आव्हाडांनी आपल्या शेरात मांडले आहे. आजकालच्या न्यायव्यवस्थेमधील त्रुटींवर बोट ठेवणारा त्यांचा शेर पहा -
'कायद्याची चाल इतकी संथ की
एक गोगलगाय चिडुनी धावली'
न्याय मिळण्यासाठी होणाऱ्या दिरंगाईसाठी गोगलगाय हे प्रतीक वापराण्याची कल्पकता त्यांच्यातील प्राविण्याची पावती देते. साध्या सोप्या भाषेत ते अगदी मर्मावर बोट ठेवताना दिसतात. आपल्या शेरांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या वेगळ्या शैलीतून ते मांडताना दिसतात. त्यांची व्यक्त होण्याची शैली, मांडणी ही उल्लेखनीय असल्याचे दिसून येते.
'सोसल्यावाचून कोणी थोर-मोठा होत नाही
डोंगरावर घाव आहे खोल दुःखाच्या दरीचा!'
'शेवटी होणार मातीचेच सारे
झाड म्हणुनी फळ पुन्हा उचलीत नाही'
दरीला डोंगराचा घाव म्हणण्याचा विचार फक्त आव्हाडच करू शकतात. त्यांनी गझलेला एक वेगळा दृष्टिकोन दिला. कमीतकमी शब्दांत आशयघन शेर लिहिणे हे आव्हाडांच्या गझलेतून शिकण्यासारखं आहे. त्यांची गझल मंचीय तर आहेच पण वाचनीयही आहे. गझलरंगसारख्या दर्जेदार गझल मुशायाऱ्यांमधून ते सर्वांना सुपरिचित झाले. कोरोना काळात अवघं जग घरात बसून होतं पण आव्हाडांनी त्या परिस्थितीतही श्रोत्यांशी ऑनलाइन संपर्क साधला. 'ऐकण्यास अत्यंत' या त्यांच्या यू ट्यूब चॅनलवरून त्यांनी आपल्या गझला सादर केल्या.
‘खोल जगण्याच्या तळाशी’ (२००६), ‘आरसा’ (२००८), ‘दारात सार्थकाच्या’ (२०१०) असे तीन गझलसंग्रह नावावर असलेल्या गझलकार विजय अव्हाडांना अंकुर साहित्य संघाचा ‘सुरेश भट स्मृतिपुरस्कार’, यु.आर.एल. फाउंडेशनचा ‘गझलउन्मेश’ पुरस्कार, पुण्याच्या हाडकर फाऊंडेशनचा ‘हेलन केलर’ पुरस्कार असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘विजा घेऊन येणाऱ्या पिढीतील’ एक महत्त्वाचा गझलकार म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले असे वाटते. त्यांच्या लेखनात असलेली उत्स्फुर्तता आणि जीवनानुभव टिपून ते नेमकेपणाने मांडण्याची कला अद्वितीय आहे. व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या या गझलकाराचे नाव मराठी साहित्य विश्वात अजरामर राहील.
साहित्य क्षेत्रात कितीही नाव असले तरी शेवटी त्यांचे जीवन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत झाले. त्यांना काही मोजक्या लोकांनी मदतही केली, पण काळ वरचढ ठरला. २४ मे २०२५ रोजी हे गझलवादळ धरणीच्या कुशीत शांत झालं. व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या या गझलकाराचे नाव मराठी साहित्य विश्वात अजरामर राहील.
..............................................

No comments:
Post a Comment