१.
जतन ठेवायला अभिजात एखादी
हवी हळवी जखम हृदयात एखादी
करा उपकार जातीवंत लोकांनो
पुन्हा हुडकून काढा जात एखादी
उगीचच भूत मी होईल मेल्यावर
नको अतृप्त इच्छा आत एखादी
सखी बेरोजगारांना मिळत नाही
मिळावी प्रेयसी स्वप्नात एखादी
फुले येतील गंधाळून प्रतिभेची
पडावी वेदना प्रेमात एखादी
असे ध्यानातही 'कामा'त एखादा
कुण्या 'मंडी'तही ध्यानात एखादी
शिकारी ब्रँड आहे वाघमारेंचा
अशी ओळख हवी नावात एखादी
२.
फक्त म्हणालो जात, धर्म ही व्याधी आहे
त्यांनी म्हटले तू तर नक्षलवादी आहे
सोन्यानाण्याची आसक्ती आहे म्हणजे
मंदिरातला ईश्वर चंगळवादी आहे
चेहऱ्यावरी वैराग्याचा रंग लावला
डोक्यामध्ये सदासर्वदा मादी आहे
त्याच्या कैफामुळेच झाल्या कैक दंगली
धर्माचा गुणधर्म किती उन्मादी आहे
सावकार तर शेती गिळून बसला भावा
धुऱ्याकरीता अपुली वादावादी आहे
न्याय-व्यवस्था सत्तेसमोर मुजरा करते
आणि लोकशाही खोक्यांच्या नादी आहे
नाव वाघमारे म्हटल्यावर सरकुन बसली
प्रियसीसुद्धा कट्टर जातीवादी आहे
३.
न केली जी हुजूरी मी, न पाया लागलो
जगाला याचसाठी मी रुताया लागलो
भुकेचे सोंग केले साजरे देवा असे
तुझा उपवास मी खोटा धराया लागलो
प्रतिष्ठा, जात, पैशाची त्वचा मी काढली
अता मी माणसावानी दिसाया लागलो
तिच्या डोळ्यांत आहे जीवघेणा भोवरा
तिथे राजीखुशीने मी बुडाया लागलो
जरासे नाव माझे लागले झळकायला
जवळच्या माणसांपासुन तुटाया लागलो
मला मृत्यूच परवडणार होता शेवटी
उगा तडजोड जन्माशी कराया लागलो
..............................................
गजानन वाघमारे
मो.९४२३६१२८७२
No comments:
Post a Comment