१.
याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले
अनंत काळापासुन सगळे धोके वाटत गेले
सलगी केली मी काट्यांशी जीव तयांवर जडला
यासाठी तर मला फुलांचे ओझे वाटत गेले
करून भांडण निघून गेली एक शक्यता माझी
एका इच्छेसाठी जीवन सोपे वाटत गेले
फार खुबीने जपून ठेवत होती चिमणी घरटे
ती गेल्यावर घरटे नुसते घरटे वाटत गेले
आयुष्याच्या प्रवासात या ठायी ठायी जगणे
जरी सुखाचे होते जगणे कोडे वाटत गेले
२.
देह अन् आत्म्यात अंतर माहिती नाही
जग इथे राहील कुठवर माहिती नाही
का तुला कळल्याच
नाहित वेदना वृक्षा
वाढलेली वेल सुंदर माहिती नाही
तू कळस झाला असावा मंदिराचा पण
तू कसा आलास इथवर माहिती नाही
चालण्याआधीच त्यांचे पाय गेलेले
वाट असते फार खडतर माहिती नाही
चालते करवत कुणावर ध्येय चुकलेली
राहिल्या जखमा मनावर माहिती नाही
३.
मी जगण्याचा हातामध्ये ब्रश पकडला होता
जीव तिचा यासाठी तर चित्रात अडकला होता
पक्ष्यांसाठी उडणे सुद्धा घातक ठरले असते
एक शिकारी नेम लावुनी नभात बसला होता
निघायला तर निघलो पण मी अजुन पोचलो नाही
तिला पाहिले रस्त्यामध्ये... रस्ता चुकला होता
आल्या होत्या कित्येक तरी थांबू शकल्या नाहित
इच्छांना बहुधा दुसरा पत्ता सापडला होता
नाकीडोळी सुंदर होती ओठ गुलाबी होते
तरी जीव हा सोनेरी केसांत अडकला होता
एक रिकामी जागा होती बाजूस तिच्या आधी
त्या जागेवर आता कोणी दुसरा बसला होता
जात राहिले जाणारे येत राहिले येणारे
हरेक वेळी दरवाजा मी हसुन उघडला होता
.......................................…....
चेतन पवार
मो. 9604242334

No comments:
Post a Comment