१.
मिळाली मुश्किलीने जी, निघुन जाणार नाही ना
मला फसवून बेचैनी निघुन जाणार नाही ना…?
पितळ उघडे जरी पडले मला त्याची फिकिर नाही
खरी चिंता मला, कल्हई निघुन जाणार नाही ना
किती अडवून धरले भूतकाळाच्या प्रवाहाला
धरण फोडून पण पाणी निघुन जाणार नाही ना
कळेना वाफ का करतो स्वतःमधल्याच पाण्याची
उगा आटत, गहन खोली निघुन जाणार नाही ना
पळत आलोय स्टेशनवर पुढिल मुक्काम गाठाया
मला भीती पुढिल गाडी निघुन जाणार नाही ना
तिला जर यायचे असलेच तर येइल कशीसुद्धा
तरी शंका पुन्हा संधी निघुन जाणार नाही ना
अता कडवटपणाचेही सुरू जोरात मार्केटिंग्
पुढे जगण्यातली गोडी निघुन जाणार नाही ना…
अनामिक दहशतीने शांतताही ओरडत उठते
चुकुन जी लागते तंद्री निघुन जाणार नाही ना
‘अरुण’ काहीतरी कर दिव्य… आत्म्यालाच वाटावे
“मला सोडून काया ही निघुन जाणार नाही ना?”
२.
निरंतर धडपडीचा काळ आहे हा
मनांच्या पडझडीचा काळ आहे हा
जराशी काळजी घ्या आत येताना...
मनाच्या पडझडीचा काळ आहे हा
असे नुसते बसुन चालायचे नाही
अवीरत धडपडीचा काळ आहे हा
अता समजेल अपला कोण परका कोण्
खर्या झाडाझडीचा काळ आहे हा
हरवली मानसिकता ऐकण्याचीही
निरर्थक बडबडीचा काळ आहे हा
बसत नाही घडी, तोवर निघा म्हणतो
खरोखर, दो घडीचा काळ आहे हा
पळत आहेत सगळे, का? कशामागे?
अकारण गडबडीचा काळ आहे हा
मरत नाही म्हणुन सोकावली आहे
जिवट म्हातारडीचा काळ आहे हा
कशी येणार विद्या घमघमत, गुरुजी?
कुठे तुमच्या छडीचा काळ आहे हा
किती धर्मांधळी भोके जहाजाला...
कदाचित जगबुडीचा काळ आहे हा
हवी शोधायला संवेदनांची लस
बधिरल्या कातडीचा काळ आहे हा
पुढे येऊन कोठे वार करतो हा?
किती भित्रा, रडीचा काळ आहे हा
फसत गेलोय अन् गेलोय फसवतही
अजब धोकाधडीचा काळ आहे हा
३.
रडू यावेच दरवेळी... गरज नसते
लढत राहू... हताशेची गरज नसते
कुपीमध्ये मनाच्या पोचतो अलगद
सुगंधाला समीक्षेची गरज नसते...
करू शकतेच की रसपान चिमणीही
हवी मैना पळसवेडी... गरज नसते
अशी माझ्यामधे तल्लीन होते की
तिला माझी अशावेळी गरज नसते
कड्याहुन झोकुनी देतो नदीसाठी
झर्याला तर तहानेची गरज नसते
प्रयोजन संपले की बंधही गळतो
पुढे बाळास नाळेची गरज नसते
हवासा पैल त्या डोळ्यांमधे दिसतो
जिथे जाण्यास नावेची गरज नसते
दरीखोर्यातला मी तर खुला वारा
दखल घेतील ‘पंखे’ही गरज नसते
...............................................

No comments:
Post a Comment