तीन गझला : विजयालक्ष्मी वानखेडे

 




१.


काय जातो मंदिराशी, काय करतो प्रार्थना

माणसा तू, माणसाची जाण आता वेदना.


गर्व सौंदर्यास होवो आम्रपालीसारखा

चूर झाला आणि केली बुद्धचरणी वंदना


जिंकले तू विश्व सारे, शोध संपे ना तुझा

कोण जाणे काय आहे मानवाची कामना


निर्मिला तू यंत्रमानव, निर्मिली ए.आय.तू

पण तुला नाही कळाली अंतरीची भावना


आजवर जे टाळले तू,तेच बोलू दे मला

आणखी सोसू किती मी,ह्या मनाच्या यातना

२.


ही कोणत्या सुखाची खैरात होत आहे

बुद्धा तुझेच दर्शन कबिरात होत आहे


माझ्यावरी जरी ही बरसात चांदण्याची

माझे तरी रुपांतर फकिरात होत आहे


टाकून फक्त दृष्टी तू दूर दूर गेला

ज्वालामुखी अजूनी माझ्यात होत आहे


ही जिद्द आज माझी चाखीन अमृताला

आता समुद्र मंथन दिनरात होत आहे


गंगेत मार डुबकी  कापून माणसांना

चिंतन असे अघोरी शिबिरात होत आहे


३.


अर्थ शाश्वत सुखाचा कळू लागला

जन्म तेव्हा जणू दरवळू लागला.


थेट झालास तू आज खांदेकरी

जीव गेला तरी घुटमळू लागला


सासरी चालली लाडकी बाहुली

बाप माझ्यातला विरघळू लागला


मत्त काळ्या ढगांनी दवंडी दिली

सूर्य आता म्हणे झाकळू लागला


आसवे आमुची खंडली ना कधी

पावसा तू पुन्हा कोसळू लागला


दोष नव्हता तिचा जाब त्याला पुसा 

सावळा का जनीला दळू लागला ?

..….........................................

No comments:

Post a Comment