१.
पापदृष्टी वासनांची सांजवेळी
काळजी घेतो मुलांची सांजवेळी
हस्त येता ऊन तापे बघ किती हे
वाढती रोपे बिजांची सांजवेळी
वाढली ही धग उनाची जीव भाजे
तप्त धरती सावल्यांनी सांजवेळी
ना भरवसा आपल्याही माणसांचा
वाटते भीती जनांची सांजवेळी
सांग ‘सागर’ वासनेला थांब थोडे
प्रीतही आता फुलांची सांजवेळी
२.
दुःखात सुखाचा श्वास दबे
काट्यात फुलांचा वास दबे
गोत्यात मला आणतोस का
नात्यात मनाचा ध्यास दबे
आरास सणाला केली आहे
धनकोत ऋणाचा त्रास दबे
किती गुलाबी स्वप्ने येती
जगण्यात खऱ्याचा भास दबे
तुलाच दुनिया दापत असते
मोहाचा सागर खास दबे
३.
नभी चांदण्यांना तमाचा पहारा
पहाटेस चंद्रा मनाचा पहारा
सदा धुंद होते कळी भृंग बसता
तिला पण नकोसा जगाचा पहारा
तिच्या धुंद नेत्री भरे भाव भोळा
नको भावनांना तनाचा पहारा
कितीदा वहावे मनासंगती तू
जरी भोवताली नभाचा पहारा
सुनेला कशाला सदा जाच ‘सागर’
नव्या या पिढीला कशाचा पहारा?
..............................................
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९
No comments:
Post a Comment