१.
मानली ना मी कधीही हार मित्रा
जाहलो नाही कुणावर भार मित्रा
येत गेली संकटांवर संकटे पण
मी कुणाचे ठोकले ना दार मित्रा
भेटले वाटेवरी जे बेसहारा
देत गेले त्यांस मी आधार मित्रा
सत्य होते तेच केले करत आलो
घेतली नाही कधी माघार मित्रा
जीव इतका लावला की काय सांगू
का तरी पाठीत केला वार मित्रा?
२.
घे काळजी स्वतःची सांभाळ माणसा
ठेवू नको उराशी कसलीच लालसा
सत्कर्म कर सदा हे ध्यान्यात घे जरा
कार्यात हो पुढे अन् उमटव तुझा ठसा
अंगी अदब असू दे जगण्यात नम्रता
वाणीत गोडवा मृदु वाटो तुझी रसा
होता मिलन तिच्याशी येते किती नशा
गंधाळताच तीही येतोस पावसा
कंटाळलीत सारी घरट्यात पाखरे
मनसोक्त खेळणे ना आनंद फारसा
येता उनाड वारा कळते कसे तिला
भेटीस येत आहे माझाच राजसा
विपरीत आज घडले सारेच बिघडले
ना राहिला कुणाला कसलाच भरवसा
३.
ठेवला मी अंतरंगी आरसा
जाणतो तो कोण अपुला वा कसा
काल जपले पूर्वजांनी ज्यासही
आज मी सांभाळते तो वारसा
संकटांनी घेरले जर का तुला
काळजी का घेत नाही माणसा?
लेकरांना लागला तुमचा लळा
तर बहरतो वाढतो मग छानसा
जे हवे ते ते मिळाले पण तरी
ठेवतो का एवढी तू लालसा?
लागले जे वेड माझ्या या मनी
लागले का ते तुलाही राजसा?
धर्म, जाती, पंथ सारे एक जर
माणसा तू भेद का करतो असा?
................................…...........
No comments:
Post a Comment