१.
बाजार देवळांचा होता तसाच आहे
व्यापार भाविकांचा होता तसाच आहे
ना पोचला कधीही कानात जो कुणाच्या
आक्रोश वंचितांचा होता तसाच आहे
आहे सुरेख सुंदर शहरात रोषणाई
अंधार झोपड्यांचा होता तसाच आहे
प्रेमात आंधळी तू होऊ नकोस पोरी
संचार भामट्यांचा होता तसाच आहे
ओठास चुंबिले तू शरदात चांदराती
रोमांच त्या क्षणांचा होता तसाच आहे
दर्जा सुमार झाला कोणास काय त्याचे
उच्छाद लेखण्यांचा होता तसाच आहे
२.
खोटेच लोक आता करतात नाव हल्ली
खोटेच लोक आता खातात भाव हल्ली
करतोय सिद्ध घोडा गाढव इथे स्वतःला
भोंदू बृहस्पतीचा करतो बनाव हल्ली
जो तो सुखात आहे भिंतीत चार अपुल्या
बाहेर कुंपणाच्या नाहीच धाव हल्ली
ठेवून ध्येय हृदयी सूर्यास मिटविण्याचे
आतूर काजव्यांचा चालू उठाव हल्ली
शब्दात मांडतो मी दु:खास माणसांच्या
अन् शेर काळजाचा घेतात ठाव हल्ली
३.
स्वाभिमानी मान माझी वाकली नाही कधी
भीक मीही संकटाना घातली नाही कधी
वाट माझी वादळांनी रोज आहे रोखली
ध्येय वेडी चाल माझी थांबली नाही कधी
गर्व जेंव्हा सोडला मी माणसे जोडायला
लाज माफी मागण्याची मानली नाही कधी
माणसाचा जन्म छोटा भान ज्याने ठेवले
माणसे ती पापमार्गी चालली नाही कधी
गाठण्याला ध्येय मोठे घाम ज्याने गाळला
हार ऐशा माणसाला लाभली नाही कधी
..............................................
डॉ. प्रशांत पाटोळे, चिंचवड, पुणे

No comments:
Post a Comment