१.
अपार एखाद्या दुःखाची उंची असते
अथांग एखाद्या जखमेची खोली असते
जिवंत असताना कोणीही फिरकत नाही
मेल्यानंतर सभोवताली गर्दी असते
प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो
प्रत्येकाची आपआपली शैली असते
कुणीच नाही दिसत स्वतःच्या शिवाय तेव्हा
डोळ्यांवर जेव्हा पैशाची धुंदी असते
आयुष्याचा एक प्रहर असतो सोनेरी
दुपारनंतर दैनिक सुद्धा रद्दी असते
म्हणून तर अपघात वाढले या रस्त्यावर
प्रत्येकाला पुढे जायची घाई असते
किलबिलाट पक्ष्यांचा तोवर सोबत येतो
झाडाला जोवर एखादी फांदी असते
सगेसोयरे , धनदौलत ना पैसा-अडका
शेवटचा आधार गडेहो काठी असते
२.
कुणाचे मन दुखवता येत नाही
मला नाहीच म्हणता येत नाही
जुनी तक्रार आहे सोबत्यांची
मला मैत्री निभवता येत नाही
असा पाषाण झाला काळजाचा
जिथे काही रुजवता येत नाही
अचानक बांध फुटतो भावनांचा
मला अश्रू लपवता येत नाही
स्वतःशी रोज होते युद्ध माझे
जगाशी मात्र लढता येत नाही
जहर झालाय अख्खा देह माझा
अता औषध पचवता येत नाही
तुझ्या धुंदीत आहे एवढा की
घरीही मज परतता येत नाही
हवी जाणीव हक्कांची स्वतःच्या
तशी सत्ता पलटता येत नाही
३.
उठून ती रात्री बेरात्री दचकत आहे
काय तिच्या हृदयात नेमकी दहशत आहे
दिसते वरवर झाड जरी हे मोहरलेले
खोल आतवर नुसता वणवा धुमसत आहे
विना तुझ्या हरवून घराचे घरपण जाते
तुझ्यामुळे माझ्या दुनियेची रंगत आहे
असाच नाही वाहत ग्रीष्मातही झरा हा
जखम जुनी एखादी नक्की उसवत आहे
अर्ध्यावर सोडून डाव ती निघून गेली
खिंड एकटा अजूनही मी लढवत आहे
............................................
शीलवंत शिरसाट मो.7498687038

No comments:
Post a Comment