१.
तुला तर वाद करण्याची सवय आहे
नको असतो मनाला तो विषय आहे
दिवस आले तसे गेले तुझ्यासोबत
कधी हसरी कधी दुखरीच सय आहे
पुन्हा अंधारल्या वाटेवरुन जाते
उजेडाचे मला दिसते वलय आहे
सुरांच्या मैफिलीची साद आल्यावर
सुरांच्या वेदनेमध्ये प्रलय आहे
रित्या डोळ्यांत पडले स्वप्न प्रेमाचे
तुझ्या प्रेमात दडलेला विनय आहे
कशाला भीक मागू मी कुणापाशी
स्वतःला सिद्ध करण्याचा समय आहे
लढाई रोज लढताना सुखासाठी
पुढे दिसतो मला माझा विजय आहे
२.
चढत जातो स्मृतीचा ज्वर मनावर
कसा उपचार करु मी काळजावर
खळ्यामध्ये उफणते दुःख माझे
सुखाचा भार पडला ना सुपावर
पुरे झाला तमाशा जीवनाचा
भरोसा राहिला नाही फडावर
किती रुतलेत काटे चालताना
तरी मी मात केली संकटावर
दिली शिकवण प्रसंगाने अनोखी
न येवो वेळ दुःखाची कुणावर
दवाची छान नक्षी पाकळीवर
चमक रंगातली दिसली फुलावर
व्यथेने घेरलेली शब्दरजनी
खरडते चार अक्षर कागदावर
३.
भरडले मी स्वतः जात्यात दु:खाला
चमक आली सुखाच्या चार दिवसाला
मनाची भिंत खचली आतली माझी
गिलावा लावला तुटक्याच प्रेमाला
अपेक्षा फार नव्हती सावलीची पण
विनवणी रोज करते तप्त सूर्याला
भुकेने फोडली पोटात किंकाळी
किती बांधून ठेवू पोट फडक्याला
मरण येते कुठे सांगून सर्वांना
निघुन जातो अचानक जीव स्वर्गाला
हसावे वाटते दुःखातही आता
कुठे आनंद येतो रोज वाट्याला
..............................................
No comments:
Post a Comment