१.
तू ठेवलेस दैवा मजला उन्हात कायम
आहे तरी तुझ्या मी, आहे ऋणात कायम
त्याचे मरंद देते ते फूल भोवऱ्याला
पण जीव भोवऱ्याचा नसतो फुलात कायम
प्रत्येक माणसाचा ठरला प्रवास आहे
ना राहण्यास आले कोणी जगात कायम
मी एवढ्याचसाठी सोसून दुःख घेते
मी पाहिले कुणाला नाही सुखात कायम
माझ्याच माणसांना कळले न दुःख माझे
सल एवढीच होती माझ्या मनात कायम
जो भेटला तयावर धरलीय सावली मी
अन् पोळले उन्हाने माझेच हात कायम
त्याला तरी घराचा रस्ता कधी न दिसला
जो येत जात होता माझ्या घरात कायम
२.
खरेच तोडणार बंद दार एकदा तरी
करेन सात सागरास पार एकदा तरी
असा कसा खुळा ससाच पारध्यास बोलतो
म्हणे करेन मी तुझी शिकार एकदा तरी
न सांगताच दुःख जाणशील काळजातले
तुझ्यासवे तसा घडो प्रकार एकदा तरी
कधी न बोलले तुला तुझ्यासवेच ठेव तू
कुठे, कशी, खुशाल मी विचार एकदा तरी
उतार लागल्यावरी चढाव लागतोच ना
म्हणून जीवनात दे उतार एकदा तरी
तरी न व्हायचे मुळीच प्रेम आंधळे कमी
कळूच दे मला तुझा नकार एकदा तरी
रुतेल काळजात ती लिहीन ओळ एकदा
जगावरी करेन मी प्रहार एकदा तरी
नकोस जीव एवढा जगात गुंतवू मना
इथून व्हायचे मला पसार एकदा तरी
३.
भार झाले तुला जाणलेले बरे
हात हातातले सोडलेले बरे
हौस होती जरा नाव गिरवायची
नाव आता तुझे खोडलेले बरे
मीठ हातात घेऊन दुनिया उभी
घाव आपापले झाकलेले बरे
लोक घेतात ना फायदा आपला
मग जशाला तसे वागलेले बरे
लोक सारे सुखाचेच वाटेकरी
भोग माझेच मी भोगलेले बरे
हा अबोला दुरावाच जर आणतो
बोललेले बरे, भांडलेले बरे
जात नाही कुठे ह्याचसाठी कधी
हे दगाबाज जग टाळलेले बरे
.............................................

No comments:
Post a Comment