१.
करतो आहे वापर केवळ
माणुसकीचा जागर केवळ
ओंजळीतल्या थेंबानाही
छळतो आहे सागर केवळ
दान देउनी कवचकुंडले
पुढे ठेवला आदर केवळ
प्रश्न जरीही कळला नाही
तरी शोधतो उत्तर केवळ
आधी नाटक सरते आणिक
पडदा पडतो नंतर केवळ
जरी उलटली पूर्ण शंभरी
जगण्यासाठी मरमर केवळ
बाळाच्या नजरेतच दिसते
आई असते सुंदर केवळ
२.
मिट्ट काळोखात सुद्धा तेवतो आहे दिवा
अन् स्वतःच्या भोवती अंधारतो आहे दिवा
पेटला होता निखारा काजळीच्या आतही
शेवटी विझला तरीही धुमसतो आहे दिवा
घात केला आपल्यांनी आणि आली संकटे
पांगळ्या पायांसवे तेजाळतो आहे दिवा
लुप्त झालेल्या दिशांची एक काळी रेघ तू
हे असे म्हणता क्षणी आभाळतो आहे दिवा
धूळ चढलेल्या क्षणांचा मागतो आहे ठसा
ह्या कुण्या गावात आता हरवतो आहे दिवा
वादळे आली किती अन् वादळे गेली किती
पण युगांचा वारसा सांभाळतो आहे दिवा
३.
हरता हरता जिंकू आपण हेच वाटले होते
सुटला नव्हता पेच तरी पण हेच वाटले होते
किती काहिली, तगमग होती तुला भेटण्याआधी
रुसला होता लहरी श्रावण हेच वाटले होते
शुल्लक होते कारण उगीच भांडत होते दोघे
पेटत गेला वाद अकारण हेच वाटले होते
विसरत नसतो जरी छवी तो, तरी विसरला अंती
जुन्या रुपाला नवीन दर्पण हेच वाटले होते
छळले नव्हते इतके त्याने छळले आहे आता
छळण्यालाही असेल कारण हेच वाटले होते
याच्या आधी तूच दिलेला घाव कोवळा होता
म्हणून साधा नसेल तो व्रण हेच वाटले होते
....................................…......
No comments:
Post a Comment