१.
एवढ्यासाठी स्वतःची सोसते आबाळ मी
जोडली होती तुझ्याशी एकदा ही नाळ मी
शुष्क धमण्यांनी मला ती ओल पुरवत राहिली
वाटलो काटा तुम्हाला बाभळीचे बाळ मी
गंध माझा शोधताना नाग इथवर पोचला
रातराणीच्या फुलांवर घेतला मग आळ मी
आजही आलाच नाही प्रश्न शेवटचा तुला
तू जरी विक्रम युगाचा जन्मत: वेताळ मी
रात्र माझी व्यापली होती सुनी त्याने... कधी
काजव्यासाठी भटकले आज रानोमाळ मी
मोकळे होतील माझे कोंडलेले हुंदके
कोर मळवट छानसा तू, वेदनेचे भाळ मी
पाहिजे तेव्हा तुला होईन का उपलब्ध मी ?
मी 'दिशा', मी ऊन, वारा, मोसमी आभाळ मी
२.
स्वप्न अर्धे थांबवा अन् वेळ द्या थोडा मला
राजपुत्राऐवजी द्या पांढरा घोडा मला
वेध घेइन रावणाचा... मी हरिण आणेनही
लक्ष्मणाची रेष बुजवा एकटे सोडा मला
झाकणे ईप्सित खरे पण साध्य झाले तर बरे
विरविरित मी वस्त्र... अस्तर जाडसर जोडा मला
ओळ एखादी पुढे येईल ज्ञानासारखी
होत नाही मान्य मी तोवर तुम्ही खोडा मला
वर मला आहे मिळाला पूर्णता व्यापायचा
मी 'दिशा' जुळते पुन्हा फोडा मला, तोडा मला
३.
हसू घेतले जर हिरावून माझे
कसे दुःख यावे तरारून माझे
सुखाला तुझ्या लागली कीड थोडी
दिले दोन अश्रू फवारून माझे
किती हट्ट करतोस तू सावलीचा
कुठे सांग लपवायचे ऊन माझे
हिरा शोधताना तयारी असावी
बघा कोळसेही तपासून माझे
भितीने तुझ्या की तुझ्या सोबतीने
पुन्हा अंग आले शहारून माझे
कदाचीत व्यापेल 'तो' भाग अर्धा
नका चित्र काढू समोरून माझे
इथे जन्मलेला इथे श्वास घेतो
निघाला कुठे गाव सोडून माझे
तिचा हात सोडून स्वप्नात रमले
'दिशा' चालली जग झुगारून माझे
..….........................................
No comments:
Post a Comment