अजिंठ्याच्या कुशीत वसलेल्या, बुलडाणा जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त असणाऱ्या मोताळा तालुक्यात ‘आडविहीर’ नावाच्या छोट्याश्या खेड्यात रमेश सरकाटे ह्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. त्यांचे वडील निनाजी खंडू सरकटे हे जलसाकार होते. धम्मक्रांतीच्या काळात समाजप्रबोधन करण्याचे कार्य तमाम शाहीर आणि जलसाकारांनी केलेले आहे. तर त्यांची आई शेवंताबाई ह्या सुद्धा जात्यावर दळता-दळता अनेक ओव्या रचत होत्या. म्हणजेच, रमेश सरकाटे ह्यांना साहित्याची देण ही रक्तातूनच मिळालेली होती. म्हणूनच पोलिस खात्यासारख्या रुक्ष वातावरणात नोकरी करूनही गझल त्यांना साद घालत राहिली.
आडविहीर पासून जवळच असणाऱ्या कृषी विद्यालय, शेंबा येथे त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमरावतीच्या विद्याभारती शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. अमरावती येथे वसतीगृहात राहून शिक्षण घेतानाच त्यांनी आपल्या गावातील बरोबरीच्या मुलांना सुद्धा शिक्षणासाठी प्रोत्साहित करून आपल्यासोबत ते अमरावतीला घेऊन गेले होते. समाजाप्रती ही कळकळ कुमारावस्थेपासूनच त्यांच्या मनात होती. सुरुवातीची तिन वर्षे त्यांनी वायरलेस अपरेटर म्हणून नोकरी केली. त्यानंतर रेल्वे पोलिस मध्ये सब इन्पेक्टरची नोकरी स्वीकारली व ह्याच खात्यात ते पोलिस आयुक्त ह्या पदापर्यंत पोहोचले. पण हा प्रवास काही सहजसाध्य नव्हता त्यांच्या दाहक संघर्षाचा प्रत्यय त्यांच्या अनुभवांवर आधारित कादंबरी 'आय.पी.एस.' आणि त्यांचे अलिकडेच प्रकाशित झालेले 'आठवणीतील चटके' हे स्वकथन वाचतांना आपल्याला येतो.
सभोवार असे कडवट अनुभवांचे रखरखीत वाळवंट पसरलेले असतांना त्यांच्या संवेदनशील मनाने गझलेचे ओएसिस जपले. पण त्यांच्या ह्या गझलेमध्ये ‘प्रीतफुले’ नव्हे तर आंबेडकरी गझलेची ‘अग्नीफुले’ तेजाळतांना आपल्याला दिसतात. आपल्या गर्जना नावाच्या गझलसंग्रहात ते स्वतः म्हणतात, "संघर्षाची बीजे स्फुल्लिंग बनतात, आणि मग विद्रोह पेटतो. त्यात आती जाते ती कमजोर दुर्बलांची! शतकानुशतके हाच न्याय भारतातील जातीव्यवस्थेने ज्यांना दिला त्याच वर्गसमूहाचे स्वानुभव, संघर्षशीलता, आत्मसन्मानाची भाषा म्हणजे माझ्या प्रस्तुत गझला होय. अंधारातून प्रकाशाचे जीवन जगण्याची ओढ दाखविणारे, कमजोर पंखांना उडण्याचे बळ देणारे, हीनदीन लोकांना मायेची ममतेची पाखर घालणारे, स्वतःतील ‘स्व’चे महत्त्व, आत्मभान, अस्मिता जागविणारे परमदैवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची आस्था, आदर म्हणजे माझ्या हृदयातील कळकळीची प्रस्तुत शब्द रचना होय" (गर्जना, मनोगत).
म्हणजेच रमेश सरकाटे ह्यांची गझल ही आंबेडकरी गझल आहे आणि त्यांच्या गझलेच्या केंद्रस्थानी बुद्धाची करुणा, बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आणि मानवी कल्याणाचा विचार आहे ह्यात दुमत असण्याचे कारण नाही.
"अंगार स्वाभिमानी ओकीत सूर्य आला
धर्मांध वेदशाही मोडीत सूर्य आला.
हे कालचक्र उलटे फिरले तुझ्यामुळे बा
एकेक सारथ्याला जोखीत सूर्य आला." (आसवांचे हार झाले, पृ.९४)
आता इथे सरळ-सरळ भीमस्तुती असली तरी एकेक सारथ्याला जोखीत सूर्य आला ह्या मिसऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या, "हा धम्मरथ पुढे नेता आला नाही तरी चालेल पण मागे ढकलू नका" ह्या सुप्रसिद्ध वचनाचा संदर्भ आहे. आंबेडकरी अनुयायिंची जबाबदारी रमेशदादा सरकाटे ह्यांनी चपखलपणे अधोरेखित केलेली आहे. एकूणच व्यवस्थेवर टिका करतांना त्यांनी समाज बांधवांवरही टीकास्त्र चालवलेले आहे.
"मिळून उच्च नोकरी कृतघ्न होत चालले
कितीक स्वार्थ साधण्या समाज विकत चालली.
तुझेच नाव आजही लिलाव होत पाहता
मनोमनी निळी कशी चळवळ आज लागली." (आसवांचे हार झाले, पृ. ९५)
आंबेडकरी अनुयायांच्या वर्तनावर आसूड ओढणाऱ्या सरकाटे दादांच्या गझलेत निर्विवादपणे एक आशावाद जाणवत राहतो. मार्गक्रमण करतांना चुका होणारच, ठेचा लागणारच, पाय रक्तबंबाळ होणारच पण त्यातूनही सावरत आम्ही निळ्या नभाला गवसणी घालणार आहोत हे व्यक्त करतांना ते म्हणतात-
“शस्त्रे नकोच येथे नाहीच युद्ध आता
शांती मिळेल कैसी टाळून बुद्ध आता
घेवू कवेत आता सारेच विश्व आम्ही
जिंकू निळ्या नभाला, होऊ प्रबुद्ध आता" (गर्जना, पृ.२७)
संपूर्ण जगाला बुद्ध तत्वज्ञानाची गरज आहे. त्यामुळे बुद्ध टाळताच येणार नाहीत आणि प्रबुद्ध होवूनच आंबेडकरी विचारांचे निळे नभ जिंकतां येणार आहे आणि त्यासाठी आमची तयारी चाललेली आहे.
सभोवतालचे दैन्य, दारिद्रय, हतबलता, सामान्य माणसाचे दुःख गझलकाराला अस्वस्थ करते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी त्यांचे मन पिळवटून निघते.
"खपाटी पोट माझे टेकले पाठीत बापोहो
नसे ना भाकरी आता घरी पाटीत बापोहो.
कुणी शेजारचा दिसतां भुकेला जर कधी मजला
कसा उतरेल माझ्या घासही घाटीत बापोहो." (आसवांचे हार झाले, पृ. ९६)
खास वैदर्भीय ढंगाची आणि माणुसकीचा संस्कार असणारी ही गझल त्यांच्या आवाजात कितीदातरी ऐकलेली आहे. आजही त्यांचा तो राकट पण लयबद्ध आवाज कानात घुमल्यासारखा वाटतो.
"सात बारा खोडले अन् पंचनामे फाडले
शासनांच्या योजनांचे तीनतेरा वाजले.
पावसाळा, बेरकी अन् गारपीटी नेहमी
कास्तकाराच्या घरी का पाचवीला वाढले" (आसवांचे हार झाले, पृ. ९७)
किंवा
"कर्जबोजा वाढलेला सातबाऱ्यावर किती
आत्महत्या रोखण्या मुलगा पहाऱ्यावर किती." (अरुणावत, पृ. २३)
किंवा
"जळतात रोज येथे भरपूर शव बळींचे
मंजूर का करेन शासन तरी तगाई" (गर्जना, पृ.३९)
अश्या शब्दात शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या शेरांमधून डोकावत राहते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी नांदुऱ्याजवळ शेती घेवून विविध प्रयोग करून बघितले. कोरोनाकाळात आपल्या शेतातच त्यांनी त्यांच्या मातोश्रीच्या नावाने पुरस्काराचे आयोजन केले. ह्याच काळात त्यांनी सलग पाच अनलाईन गझल मुशायऱ्यांचे आयोजन केले होते. गझलधारा नावाच्या आंबेडकरी गझलेच्या स्मरणिकेचे संपादनही त्यांच्या नावावर आहे. विविध साहित्य संस्थांशी सुद्धा ते जुळलेले होते. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेवटपर्यंत सक्रीय होते.
"जगणे कसे जगावे अंधार पीत आम्ही
विद्रोह रोज करतो दुखणे लिहीत आम्ही” (अरुणावत, पृ.८०)
अश्या शब्दांत ते शेवटपर्यंत लिहीत होते. आंबेडकरी व्यक्ती सहसा स्त्री पुरुष समानता मानणारे असतात . त्याचेही दर्शन रमेशदादांच्या गझलांमधून दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाचवेळी गावकुसाबाहेरील स्री आणि पुरुषांचे आत्मभान जागृत केले त्यांचा तो परिपाक आहे. ते म्हणतात-
“पुरुषासमान नारी समजून एक वागू
माणूस म्हणून राहू विसरून आडनावे." (अरुणावत, पृ.२८)
माणसा माणसातील एकूणच भेदभाव विसरण्याचा संदेश इथे दिसतो.
"पुत्र झाला हर्षती सारे खुषीने
गर्भ असता का मुलीचा टाळतो तू" (गर्जना, पृ.६२)
लिंगभेदाच्या विरोधातही ते व्यक्त झाले आहेत.
रमेश सरकाटे सक्रीय राजकारणात कधीच नव्हते पण त्यांची राजकीय विचारधारा पण पक्की होती.
"शाहिरांना मान नाही शासनाला भान नाही
शंबुकाला मारणारे संपले का बाण नाही." (आसवांचे हार झाले, पृ.३५)
किंवा
"काय त्यांचा डाव आहे घ्या तुम्ही समजून आता
खोल कैलास घाव आहे घ्या तुम्ही समजून आता".
करून विधवा लोकशाही देश विकती हेच लुच्चे
कोण येथे राव आहे घ्या तुम्ही समजून आता" (गर्जना, पृ.२८)
व्यवस्थेवर टिका करतांना त्यांच्या लेखणीला धार चढते. ते म्हणतात-
"अच्छे दिन आल्याने, आता गाभण होतो हेला
अन् म्हणती विश्वामध्ये, अजरामर भारत केला
छंदात, फांदी बाबा हे लुटीत भोळ्या जनतेला
महती सांगे भक्तांना बाबांचा निस्सीम चेला" (अरुणावत, पृ.१६)
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचा काळ असला तरी आपले रोख ठोक मत मांडण्यास ते कधीही कचरले नाहीत. ते स्वभावाने परखड आणि स्पष्टवक्ते होते. कोणताही आडपडदा न ठेवता जे मनात असेल ते बोलून मोकळे व्हायचे असा त्यांचा बाणा होता. त्यामुळे काहीजण दुखावण्याची शक्यता असते पण त्यांची तमा त्यांनी बाळगली नाही. म्हणूनच भावकीवर, संधीसाधू लोकांच्या पाखंडी वर्तनावरही त्यांच्या गझलेमधून आसूड ओढण्यात आले आहे.
"कर्जात मी बुडालो, आधार ना कुणाचा
माझीच भावकीही स्वार्थी हुशार झाली." (अरुणावत, पृ. ८६)
किंवा
"माझ्या कलेवराला का सजविता गड्यांनो
होतो जिवंत तेव्हा वाजली ना दवाई." (गर्जना, पृ. ३९)
माणसांच्या दांभिकपणावर किती नेमकेपणाने त्यांनी प्रहार केला आहे. सामान्य माणुस दुःखाच्या धक्क्याने कोलमडून जातो. कलावंत मात्र त्या दुःखालाही कलेच्या कोंदणात बसवतो. रमेश सरकाटेही ह्याला अपवाद नव्हते. सेवानिवृत् झाल्यावर ह्या तगड्या, धिप्पाड माणसालाही कर्करोगासारख्या घातकी रोगाने चोरपावलांनी गाठले. पण सरकाटे दादा तरीही डगमगले नाहीत. ज्या टाटा हॉस्पीटलमध्ये ते उपचार घेत होते त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी भोजनदान दिले होते. वेगवेगळ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी अनेकदा वह्या पुस्तकांचे वाटप केलेले आहे. दुर्धर आजाराशी ह्या माणसाने हसतमुखाने झुंज दिली. मात्र तरूण इंजिनिअर मुलीच्या आकस्मिक निधनाने त्यांच्यातील बापाला मात्र नेस्तनाबूत केले. मुलीच्या मृत्यूचे शल्य अखेरपर्यंत त्यांना पोखरत राहिले. आपला तिसरा आणि अखेरचा गझलसंग्रह ‘अरुणावत’ त्यांनी मुलीच्या स्मृतींनाच अर्पण केलेला आहे.
"संसार मांडलेला, तोडून लेक गेली
भरल्या घरास मोठ्या जाळून लेक गेली
मुलगी मुळीच नव्हती होतीस माय माझी
बाधाल एकटे का सोडून लेक गेली".
असा त्यांनी फोडलेला विदीर्ण टाहो अरुणावतच्या अर्पणपत्रिकेत गहिवरून टाकतो. मुलींच्या स्मरणार्थ सुद्धा त्यांनी अनेकदा जनहितार्थ कामे केली. आपल्या मुळगावी म्हणजेच आडविहीरला समाजमंदिर उभारणीसाठी भरीव मदत केली.
पदाच्या बडेजाव त्यांनी कधीही दाखवला नाही. मुंबईचे आंबेडकरी गझल संमेलन असेल, नांदेडचे ‘विचारवेध संमेलन’ असेल किंवा अलिकडील अंमळनेरचे ‘विद्रोही साहित्य संमेलन’ असेल माझ्या गाडीने आम्ही एकत्रित प्रवास केलेला आहे. त्यावेळी त्यांच्या खाकी वर्दीआड लपलेल्या साध्या संवेदनशील स्वभावाचे व त्यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांमधून त्यांच्या निर्मळ मनाचे दर्शन झाले आहे. साहेबीपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्या-बोलण्यात नव्हता. मस्त वऱ्हाडी बोलीभाषेत ते आमच्याशी बोलत असायचे. वऱ्हाडी भाषेचा त्यांचा शब्दसंग्रह विपूल होता. गझल असो वा कादंबरी जे भोगावे लागले, जे मनात आले ते मांडण्याचा त्यांनी प्रांजळ प्रयत्न केला. त्यांच्या गझलेमधून भारी खयाल, कठीण शब्द किंवा अर्थाचे बहुविध पदर आढळत नाहीत; तर सर्वसामान्य माणसाचे जगणे वागणे तश्याच साध्यासुध्या शब्दांत आलेले आहे.
"खाकीतल्या माझ्या मनाला ठेवले निर्मळ येथे
लोभी क्षणाला टाळता ईमान मी सांभाळले." (गर्जना, पृ.१८)
मनातले विचारच आपल्या साहित्यातून प्रतिबिंबित होत असतात हे काही खोटे नाही. नात्याने ते माझे जिजाजी लागत होते तसेच वयानेही बरेच ज्येष्ठ होते तरीही मॅडम शिवाय ते कधीही माझ्याशी बोलले नाहीत. "मॅडम, माझ्यावरही असाच एखादा श्रद्धांजलीपर लेख तुम्हाला लिहावा लागेल" असे ते एकदा बोलता बोलता सहजच बोलून गेले पण आज त्यांचे ते शब्द खरे ठरत आहेत आणि आज हा लेख लिहितानाही कंठ दाटून येत आहे. दि. ३१ मे २०२५ रोजी त्यांचे दुःख द निधन झाले. त्यांनी जोपासलेला प्रचंड जनसागर हळहळला. ह्यात मोठ्या आप्तपरीवारासोबतच मित्र, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, राजकीय पुढारी आणि साहित्यिकांचा समावेश होता. मृत्यूला चकवतांनाही त्यांनी लिहून ठेवलेले होते-
"जीवन सारे जगून गेलो घाई घाई
आयुष्याला फसून गेलो घाई घाई.
अंतरातले दुःख कुणाला कशास सांगू
मरणावरती हसून गेलो घाई घाई" (अरुणावत, पृ. ८३)
आंबेडकरी साहित्य अकादमीचे ते राज्य संघटक होते. मात्र तब्ब्येतीमुळे मी काम करू शकत नाही ह्याची खंत ते नेहमीच बोलून दाखवित असतं. त्यांचा संस्थेला किती उपयोग झाला हा प्रश्न तसा निरर्थक आहे. संस्थेत त्यांचे अस्तित्वच पहाडासारखे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी साहित्य अकादमीचे व गझल क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आणि मागे फक्त आठवणी उरलेल्या आहेत. त्यांच्या स्मृतींना त्यांच्याच शब्दात विनम्र आदरांजली!
"तुझ्या आठवांचा उजाळा कितीदा
स्मृतींची भरे पाठशाळा कितीदा"
..............................................
विजयालक्ष्मी वानखेडे
अध्यक्ष आंबेडकरी साहित्य अकादमी, बुलडाणा
मो. 9922521938
No comments:
Post a Comment