१.
फासात आवत्याला पकडून भाकरीने
शेतात व्यस्त केले दपटून भाकरीने
पोटातल्या भुकेच्या पाहून तप्त ज्वाळा
बघ घेतले स्वतःला भाजून भाकरीने
पडली गरज भुकेला आवाज दे कधीही
मज ठेवले असेही सांगून भाकरीने
उपवास सोसणाऱ्या दारात झोपड्यांच्या
पुरते दिले स्वतःला झोकून भाकरीने
देशाभिमान तेवत जागृत ठेवला हो
रक्तात माणसाच्या मिसळून भाकरीने
पाहून तांडवाला पोटातल्या भुकेच्या
जात्यात घेतले मग भरडून भाकरीने
गरजेनुसार घ्यावी ताटात जेवताना
समजावले भुकेला विनवून भाकरीने
होऊन माय सग्गी पोसावया जगाला
मातीत घेतले हो प्रसवून भाकरीने !
२.
मी व्यथेला नेहमी कुरवाळले आहे
काळजाच्या आत जपुनी ठेवले आहे
का फुलांची आस करतो पेरुनी काटे
तेच तर उगवेल जे तू पेरले आहे
खोडुनी मिटणार नव्हते नाव जर माझे
का तिने हातावरी मग कोरले आहे
राहणारे काय आहे ? मीच नसताना
शब्द आणिक प्रेम अवघे वाटले आहे
दोन सांजेच्या मुलांच्या भाकरीसाठी
कैकदा हातास आई भाजले आहे
रुख्मिणीला घेउनी या पाहुणी म्हणुनी
विठ्ठलाला मी निमंत्रण धाडले आहे
ओळखावे चांगल्या वाईट गोष्टींना
एवढे तर ज्ञान मजला लाभले आहे
एक मतला दोन शेरांना समजण्याला
लेखकांना वाचले अन् ऐकले आहे
पाहिजे जितके मला माझ्या विधात्याने
एवढे सुख-दुःख पदरी टाकले आहे
जन्मभर पुरतील इतके भेटले आहे
मी सुखासह दुःखही जोपासले आहे
३.
ऐकणारे फार झाले बोलणारा पाहिजे
शब्द-साधक लेखणीने झोडणारा पाहिजे
वेळ आली न्याय निर्वाळा करायाची कधी
शब्द निर्भिड, हक्क अपुले मांडणारा पाहिजे
बोलणे असतेच सोपे, व्हायला हे पाहिजे
मग तुझाही शब्द धगधग पेटणारा पाहिजे
शांततेला मानणारा सभ्यतेचा चेहरा
वेळ येता शत्रुसोबत भांडणारा पाहिजे
देउनी जातात जर ते बेगडी आश्वासने
तर्क अपुला फोल गोष्टी मोजणारा पाहिजे
कायद्याच्या चौकटीला जाणुनी घे माणसा
संविधानिक हक्क अपुले मागणारा पाहिजे
आळशी नाही ससा तर धावणारा पाहिजे
या जगाच्या शर्यतीला जिंकणारा पाहिजे
............…...............................
No comments:
Post a Comment