१.
सगळे सगळे सगळे काही करून झाले माझे
उरले-सुरले दाणे सुद्धा टिपून झाले माझे
म्हणायला सुद्धा आता मी दगड राहिलो नाही
पाझर फुटण्याआधी मित्रा फुटून झाले माझे
सिग्रेटींसोबत इच्छाही फुकून झाल्या सगळ्या
दुःखालाही झुरका झुरका स्मरून झाले माझे
उशीर झाला आहे थोडा मला माळण्यासाठी
निर्माल्याच्या वाटेवर मी, फुलून झाले माझे
प्रश्न मला पडलेला आहे काय करू मी आता
होते नव्हते सगळे डोळे पुसून झाले माझे
आता काही उरले नाही काही उरले नाही
जगून झाले माझे मित्रा जगून झाले माझे
२.
पाहिले होते अचानक काळजीमध्ये तुला
घेतले होते म्हणूनच तर मिठीमध्ये तुला
त्या क्षणाला मी उन्हे समजून घेऊ लागलो
ज्या क्षणाला आणले मी सावलीमध्ये तुला
खूप दिवसांनी वहीचे पान पलटू लागलो
खूप दिवसांनी बघितले पाकळीमध्ये तुला
जा समुद्राच्या दिशेने पण नको विसरूस की
आणले आहे प्रवाहाने नदीमध्ये तुला
स्पर्शही करणार नाही कोणता वारा तुला
ठेवले आहे मनाच्या देवळीमध्ये तुला
३.
आठवांच्यासारखी रेंगाळली नाही
लाट आलेली किनारी थांबली नाही
थांबलेली पानगळ आहे, कसे बोलू?
पालवी नावासही जर जन्मली नाही
काय होते वारल्यानंतर कसे सांगू?
आजवर इच्छा कधी मी मारली नाही
ज्याक्षणी डोळे तुझे डोळ्यांपुढे आले
फक्त बुडलो त्यांत, खोली मोजली नाही
हे स्थलांतर एवढे कट्टर कसे झाले?
एकही मागे निशाणी सोडली नाही
मोगरा केसांमधे चुरगाळला गेला
कल्पना कुठलीच मग गंधाळली नाही
वेचली होतीस तू जिथली फुले केव्हा
आठवण तिथली कधी कोमेजली नाही
...............................................
No comments:
Post a Comment