वा. न. सरदेसाई यांच्या गझलेचा आकृतिबंध : प्रा.ज्योती स्वामी

 



मराठीमध्ये गझल हा काव्यप्रकार १९२० नंतर, माधव ज्युलियन यांच्यामुळे जाणीवपूर्वक लिहिला जाऊ लागला. माधव ज्युलियन हे गझल हा शब्द, 'गज्जल' असा  उपयोजित असत तर त्यांनी स्वीकारलेला आकृतिबंध म्हणजे गझलेमध्ये वृत्त, यमक आणि अंत्ययमक हे सर्व घटक फार्सी आणि उर्दू भाषेमध्ये जसे आहेत तसेच त्यांनी स्वीकारले आहेत. तसेच फार्सी व उर्दूतील वृत्त मराठीमध्ये त्यांनीच 'छंदोरचना' या ग्रंथात परिवर्तीत केलेले आहेत. गेली शंभर वर्षे याच वृत्तामध्ये मराठी गझल लिहिली जात आहे. माधव ज्युलियन यांच्यानंतर सुरेश भट यांनी गझल लेखन, प्रचार आणि प्रसार यासाठी मोठे योगदान दिले आहे. १९७० नंतर प्रामुख्याने सुरेश भट यांच्या प्रभावातून आणि प्रेरणेनेच प्रामुख्याने गझल लिहिली जात आहे.

सुरेश भटांच्या प्रेरणेने गझल लेखन करणारे अनेक कवी १९८० नंतर पुढे आले. त्यामध्ये श्रीकृष्ण राऊत, वा. न. सरदेसाई, संगीता जोशी, इलाही जमादार, ए.के. शेख आदी अनेक महत्त्वाच्या गझलकारांची नावे सांगता येतील. माधव ज्युलियन यांच्या प्रभावातून गझलेकडे वळलेल्या गझलकारांची गझल ही तंत्र आणि आशय या दोन्ही पातळ्यांवर भट प्रभावातील गझलेपेक्षा वेगळी होती. सुरेश भट यांनी गझल अधिक तंत्रशुद्ध लिहिली जावी यासाठी अनेक प्रकारे स्वतः प्रयत्न केले. त्यामुळे १९८० नंतर मराठी गझल अधिक तंत्रशुद्ध होत गेली. सुरेश भट यांचे अनुकरण करून किंवा त्यांचे मार्गदर्शन घेऊन गझलकार गझल लिहीत होते; त्यातील त्यांचे जे समकालीन गझलकार तंत्रशुद्ध गझल लिहीत होते, त्यापैकी वा.न. सरदेसाई हे एक महत्त्वाचे नाव आहे.

वा.न. सरदेसाई यांचे, 'माझी कविता’ (१९८४), 'आभाळ पंख’ (२०००) अणि 'चांदण्याची तोरणे' हे तीन कविता संग्रह प्रकाशित आहेत. वा. न. सरदेसाई यांनी कवितेचे अंगाई, गझल, रुबाई, नाट्यगीत, लावणी, पोवाडा, भावगीत, गवळण, हायकू आणि दोहा प्रकार लिहिले आहेत. या सर्व काव्य प्रकारांत वृत्त आणि छंदाचे अतिशय काटेकोरपणे उपयोजन केले आहे. या तिन्ही संग्रहातील तसेच इतर प्रकाशित आणि अप्रकाशित संपूर्ण कविता त्यांच्या 'अंगाई ते गझल रुबाई' समग्र वा. न. सरदेसाई (२००९) या ग्रंथात एकत्रित करण्यात आली आहे. या ग्रंथात विविध प्रकारांतील १५२ कविता आहेत, १४१ गझल आहेत आणि १२० रुबाया आहेत. या सर्वच कवितांमध्ये त्यांनी छंदशास्त्राचे नियम वापरलेले आहेत. तसेच सरदेसाई यांची कविता प्रयोगशील आहे. तिने अनेक नवे आदर्श निर्माण केले आहेत.


१) आकृतिबंधाचे स्वरुप

वा. न. सरदेसाई यांच्या समग्र ग्रंथामध्ये, गझल या विभागामध्ये (पृ. २३६ ते ३८१) गझलेच्या आकृतिबंधातील २ नाट्यगीते आणि १४१ गझला आहेत. या आकृतिबंधाच्या दृष्टीने तंत्रशुद्ध आहेत. प्रत्येक गझल वृत्तबद्ध आहे. यमक आणि बहुतांश गझला अन्त्ययमकासह आहेत. किमान पाच द्विपदींची ही अट त्यांनी पूर्ण केली आहे.

प्रचलित अक्षरगणवृत्तांबरोबरच त्यांनी अप्रचलित अक्षरगणवृत्तांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला आहे. तसेच काही प्रमाणात मात्रावृत्तांचाही उपयोग केला आहे. यमकांचे उपयोजन करताना एकस्वरी यमकाचेच सर्वाधिक उपयोजन केले आहे. तर अल्प प्रमाणात बहुस्वरी आणि केवळ स्वरी यमकांचे उपयोजन केले आहे. अंत्ययमक (मुरद्दफ) असणाऱ्या गझलच प्रामुख्याने लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गझल या संपूर्ण तंत्र सांभाळणाऱ्या, आशयसंपन्न आणि तंत्रशुद्ध झाल्या आहेत.


२) आकृतिबंधाचे उपयोजन 

वा. न. सरदेसाई यांनी गझलेच्या आकृतिबंधातील वृत्त, यमक आणि अंत्ययमक या घटकांचे आकृतिबंधातील वृत्त, यमक आणि अंत्ययमक या घटकांचे उपयोजन कसे केले आहे? ते पुढीलप्रमाणे पाहता येईल.


१) वृत्त-उपयोजन 

मराठीमध्ये साधारणपणे अक्षरगणवृत्तात गझल लिहावी असा नियम आहे. तरीही बहुतांश गझलकार, रचनेची अपरिहार्यता म्हणून अनेकदा काही प्रमाणात मात्रावृत्तांचा उपयोग करतात. वा. न. सरदेसाई यांच्या १४१ पैकी ९४ गझला या अक्षरगणवृत्तात आहेत. तर ४७ गझला या मात्रावृत्तात आहेत. व्योमगंगा, देवप्रिया, हिरण्यकेशी, मेनका, स्त्रग्विणी, मंजूघोषा, मृगाक्षी, आनंदकंद, भुजंगप्रगात, यामिनी व प्रसूनांगी ही प्रचलित वृत्तं त्यांनी उपयोजिलेली आहेत. त्याच बरोबर देवराज, पाणिबंध, मदिराक्षी, महामाया, शुभकामी, मयूरसारिणी, इंद्रवंशा, रम्यकृती, उपेंद्रवज्रा आणि प्रेय या अनावर्तनी आणि अप्रचलित वृत्ताचेही मोठ्या प्रमाणात उपयोजन केलेले आहे. त्यांनी एकूण ७० अक्षरगणवृत्त आणि २० मात्रावृत्तांचे उपयोजन केले आहे. मराठीमध्ये ७० अक्षरगणवृत्तांचे उपयोजन करणारे त्यांच्या समकाळीन गझलकारांमध्ये ते एकमेव गझलकार आहेत. त्याबरोबरच त्यांच्या समकालीन गझलकारांमध्येही सर्वाधिक तंत्रशुद्ध गझल लिहिणारे ते एक गझलकार आहेत. त्यांच्या वृत्त उपयोजनाची पुढील प्रमाणे काही उदाहरणे पाहता येतील.





 सरदेसाई यांच्या अक्षरगणवृत्तातील ९४ पैकी ४० गझलांमध्ये त्यांनी एका गुरू ऐवजी दोन लघू वर्णांची सवलत घेतली आहे. काही गझलांमध्ये गणदोष आहेत. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही त्याच्या समकालीन गझलकारांपेक्षा त्यांच्या गझलेत त्यांनी वृत्त उपयोजन अधिक काटेकोरपणे केले आहे. 'मंजूघोषा' हे सर्वाधिक उपयोजिले जाणारे आणि म्हणूनच अतिशय प्रचलित असणारे आवर्तनी वृत्त उदाहरण म्हणून घेतल आहे. तसेच इंद्रवंशा हे अनावर्तनी आणि अप्रचलित वृत्त तर अनलज्वाला हे मात्रा वृत्त उदाहरण म्हणून घेतले आहे. यावरून त्यांची वृत्तावर असणारी पकड त्यातील वैविध्य आणि एकूणच त्यांच्या गझलेतील प्रयोगशीलता लक्षात येते.


२) यमक उपयोजन 

यमक हा गझलेच्या आकृतिबंधातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. यमक नसेल तर त्या काव्याला 'गझल' म्हटले जात नाही. म्हणजेच यमकाशिवाय गझल संभवत नाही. मराठीमध्ये सुरेश भट यांनी, एकस्वरी यमकांची गझल लिहावी, ती तंत्रशुद्ध गझल आहे असे म्हटले आहे. पण तरीही बहुस्वरी, केवल स्वरी आणि सवती अशा सर्व प्रकारच्या यमकांचे उपयोजन मराठीमध्ये केले जाते.

वा.न. सरदेसाई यांच्या एकूण १४१ गझला आहेत. त्यांपैकी त्यांनी १३२ एकस्वरी, ६ बहुस्वरी आणि ३ केवल स्वरी यमकाच्या गझल लिहिल्या आहेत. सवती यमकचे उपयोजन केलेले नाही. म्हणजेच १४१ पैकी केवळ ९ गझलांमध्ये त्यांनी सवलत घेतली आहे. १३२ गझल या एकस्वरी यमकाच्या असल्याने मराठीमध्ये रुढ असलेल्या नियमाप्रमाणेच त्यांनी सर्वाधिक गझल लिहिल्या आहेत. या संदर्भातील उदाहरणे पुढील प्रमाणे पाहता येतील.

१. एकस्वरी यमक 

'राहिले रे अजून श्वास किती ? 

जीवना, यामधील खास किती?' ४

२. बहुस्वरी यमक 

'काळजीच्या चेहऱ्यांनी भेटणारे पाहिले 

मोजका आनंदसुद्ध वाटणारे पाहिले?'  ५

वरील उदाहरणामध्ये, 'भेटणारे' आणि 'वाटणारे' हे दोन यमक आहेत. त्यातील ‘णारे’ हे स्थिर वर्ण आहेत तर त्याच्या आधीच्या वर्णातील स्वर 'ए' आणि 'आ' हे भिन्न स्वर आहेत.

३. स्वरयमक 

'फुलेच वेचायचे जरी इरादे होते 

हरेक झाडापाशी कुशाग्र काटे होते' ६

वरील उदाहरणामध्ये 'इरादे' आणि 'काटे' हे दोन यमक आहेत त्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये 'ए' हा समान स्वर आहे. मराठीतील बहुतांश गझलकारांनी सवती (काफिया) यमकाचाही प्रयोग केला आहे. मात्र सरदेसाई यांनी सवती (काफिया) यमकाचा प्रयोग केलेला नाही. यमकाच्या शब्दांचे उपयोजन करतांना बहुतांश योजित शब्दांचा आणि क्वचित विशुद्ध शब्दांच्या यमकांमध्ये उपयोजन केले आहे. ली, ले, चे, तेच असे प्रत्यय असलेले, भेटणारे, वाटणारे, वाटले, जाहले आदी योजित आणि दार, तार, वार, गात, वात आदि विशुद्ध शब्दांचे यमक उपयोजिलेले आहेत. एकूणच सरदेसाई यांनी बहुतांश एकस्वरी यमक असलेलीच गझल लिहिली आहे. म्हणजेच उत्कृष्ट प्रतीची गझल लिहिली आहे.


३) अंत्ययमक उपयोजन 

अंत्ययमक हा गझलेच्या आकृतिबंधाचा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक द्विपदीच्या शेवटी आवृत्त अंत्ययमकाचा शब्द किंवा शब्दसमूह आवर्त होत असल्याने तिथे अनुप्रास अलंकार होतो. यामुळे गझल अधिक लयदार होते. पण अंत्ययमक नसेल तरीही उत्तम गझल लिहिली जाते. मराठीमध्ये अंत्ययमक नसणारी (गैरमुरद्दफ) गझल ही मोठ्या प्रमाणात लिहिली जाते. वा. न. सरदेसाई यांनी १४१ पैकी ११० गझला या अंत्ययमकासह (मुरद्दफ) लिहिलेल्या आहेत. तर केवळ ३१ गझला या विना अंत्ययमक (गैरमुरद्दफ) आहेत. म्हणजेच त्यांनी बहुतांश गझलेत अंत्ययमकाचे उपयोजन केले आहे. त्यांचे अंत्ययमकही त्यांच्या गझलेप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांच्या अंत्ययमक उपयोजनाविषयी राम पंडित म्हणतात, "सरदेसाई मुरद्दफ गझलांत रदीफची निवड करतात ते इतरांहून वेगळे असावे. शेराची सुंदरता अधिक खुलावी अशा शब्दांची निवड त्यामुळे वाचताना वा ऐकताना त्यातील मोहक मांडणी सुखावून जाते. उदा. बरे नाही, कांहीतरी, खरे म्हणजे कुणाला कांही, कसा इथे, नाहीत दुःखे, खरी मजा, सुरेखशी, आयुष्य माझे, कसले जिणे, मंजूर आहे इ. रदीफच्या गझला आपले स्वतंत्र अस्तित्त्व, वाचताना जाणवून देतात" ७. वेगळे अंत्ययमक असलेल्या द्विपदीचे पुढील प्रमाणे उदाहरण पाहू - 

'का तुझ्या स्मृतिंना खिळून बसलो आम्ही? 

मन मजेत जखमी करून बसलो आंम्ही!' ७

'बसलो आंम्ही' हे अतिशय वेगळे अंत्ययमक उपयोजन सरदेसाई यांनी आशयसंपन्न गझल लिहिली आहे. त्यांच्या बहुतांश गझलांमध्ये त्यांनी अशाच प्रकारचे नवनवीन अंत्ययमक (रदीफ) उपयोजिले आहेत.

त्यांनी जी विना अंत्ययमक (गैरमुरद्दफ) गझल लिहिली आहे त्याचेही उदाहरण पाहू -

'ना आरशाला धड स्वतःचा चेहरा

हा इतर मुखड्यांचा किती पण हावरा!' ८

या उदाहरणात अंत्ययमक नसले तरी आकृतिबंधाचे इतर नियम पाळून लिहिलेली ही उत्तम (शेर) द्विपदी आहे. त्यामुळे त्यांच्या अंत्ययमक नसणाऱ्या गझलही उत्तम आहेत.


३) आकृतिबंधातील दोष 

वा. न. सरदेसाई यांच्या १४१ गझला या वृत्तबद्ध आहेत. यात गझलेला मारक ठरतील इतके वृत्तदोष नाहीत. त्यांनी कांही ठिकाणी एका गुरूऐवजी दोन लघूची सवलत घेतली आहे. १४१ पैकी ४० गझलांमध्ये ही सवलत घेतली आहे. यमक उपयोजन करताना, प्रामुख्याने त्यांनी नियमानुसार १३२ एकस्वरी यमकांचे उपयोजन करून गझला लिहिल्या आहेत. केवळ ९ गझला या बहुस्वरी आणि केवळ स्वरी आहेत. ज्यामध्ये स्वरचिन्ह अर्थात अलामत सांभाळलेली नाही. तर विना अंत्ययमक असणाऱ्या गझल ३१ आहेत. काही प्रमाणात हे दोष आढळतात.


४) आकृतिबंधाची वैशिष्ट्ये 

वा. न. सरदेसाई यांची बहुतांश गझला तंत्रशुद्ध आहेत. आकृतिबंधातील सर्व घटकांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले आहे. वृत्त उपयोजन करताना त्यात मात्रा, यती किंवा गणदोष राहणार नाहीत याची काळजी घेतली आहे. बहुतांश गझलकार प्रचलित २५-३० (आवर्तनी) अक्षरगण वृत्तांचे उपयोजन करतात पण वा.न. सरदेसाई यांनी प्रचलित आणि अप्रचलित ७० अक्षरगणवृत्तांचा तर २० मात्रावृत्तांचा प्रयोग केला आहे. मराठीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वृत्तांचा प्रयोग करणारे ते एकमेव गझलकार आहेत. तसेच त्यांच्या समग्र वाङ्मयाच्या ग्रंथात त्यांनी गझालांचे वृत्त, केलेले प्रयोग, वृत्तांची लगावली आणि त्यांच्या गझलात घेतलेली सवलत या सर्वांविषयी नोंदी केल्या आहेत.

यमक उपयोजन करताना त्यांनी १३२ गझलांमध्ये एकस्वरी यमकांचे उपयोजन केले आहे. हे प्रमाण मराठीमध्ये उत्तम दर्जाची गझल लिहिली जाते याचेच उदाहरण आहे. या बरोबरच १४१ पैकी ११० गझला अंत्ययमकासह लिहिलेल्या आहेत. वा. न. सरदेसाई यांच्या गझलेच्या आकृतिबंधाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. वरील प्रमाणे त्यांची नोंद केली आहे.

सुरेश भटांचे समकालीन आणि १९८० नंतरचे तंत्रशुद्ध गझल लिहिणारे गझलकार म्हणून वा. न. सरदेसाई यांचे मराठी गझल वाङ्मयातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. माधव ज्युलियन यांच्यानंतर मराठीमध्ये त्यानींच सर्वाधिक वृत्तांचे उपयोजन करून गझल लिहिली आहे. त्यामुळे अनेक पद्धतीने त्यांच्या गझलेचे मूल्यमापन केल्यानंतर मराठीतील ती एक तंत्रशुद्ध आणि आशयसंपन्न गझल आहे हे लक्षात येते. सुरेश भट, खावर, श्रीकृष्ण राऊत, इलाही जमादार, संगीता जोशी, ए. के. शेख या त्यांच्या समकालीन गझलकारांप्रमाणेच वा. न. सरदेसाई यांनीही, मराठी वाङ्मयासाठी भरीव योगदान दिले आहे.


५) निष्कर्ष 

१) वा.न. सरदेसाई यांनी ७० अक्षरगण वृत्तात आणि २० मात्रा वृत्तात एकूण १४१ गझल लिहिल्या आहेत.

२) वृत्तांचे एवढ्या प्रमाणात उपयोजन करणारे ते मराठीतील एकमेव गझलकार आहेत.

३) १४१ पैकी १३२ गझलांमध्ये एकस्वरी यमकांचे उपयोजन केले आहे.

४) सरदेसाई यांनी ११० अंत्ययमकासह (मुरद्दफ) आणि ३१ विना अंत्ययमक (गैरमुरद्दफ) गझल लिहिल्या आहेत.

५) प्रचलित, अप्रचलित आणि मात्रा वृत्तांचेही त्यांनी उपयोजन केले आहे.

६) तंत्रावर त्यांची पकड आहे. त्या बाबत स्पष्टता आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच गझल तंत्रशुद्ध आहेत.

७) सरदेसाई यांनी वृत्त, यमक आणि अंत्ययमक या घटकांचे विविध प्रयोग करून अतिशय दर्जेदार गझल लिहिली आहे.

८) सरदेसाई यांच्या समकालीनांप्रमाणे त्यांच्यावरही सुरेश भट यांचा प्रभाव आहे पण ते त्या प्रभावात अडकलेले नाहीत.

९) वा.न. सरदेसाई यांनी स्वतःची शैली विकसित करून गझल लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या गझलेने भट यांनी सांगितलेला आकृतिबंध स्वीकारला, मात्र आपल्या अभ्यासाने मराठी गझलेच्या आकृतिबंधात अनेक यशस्वी प्रयोग करून, मराठी गझलेला समृद्ध केले. 

१०) वा. न. सरदेसाई हे सुरेश भट यांच्या नंतरचे एक महत्त्वाचे गझलकार आहेत.

..............................................

संदर्भ -

१) अंगाई ते गझल रुबाई समग्र वा.न. सरदेसाई, इंद्रनील प्रकाशन, मुंबई, प्रा.आ. २००९, पृ.क्र. २७८.

२)  उ.नि.प्र.क्र. २७९

३)  उ.नि.प्र.क्र. ३७३

४)  उ.नि.प्र.क्र. ३११

५)  उ.नि.प्र.क्र. २५५

६)  उ.नि.प्र.क्र. २५७

७)  डॉ. राम पंडित, चांदण्याची तोरणे, प्रस्तावना, इंद्रनील प्रकाशन, मुंबई, प्रा.आ. २००३, पृ. क्र. ८

८)  'वा.न. सरदेसाई' अंगाई ते गझल रुबाई समग्र वा.न. सरदेसाई, इंद्रनील प्रकाशन, मुंबई, प्र.आ. २००९, पृ.क्र. ३७७

९)  उ.नि.प्र.क्र. २९८


No comments:

Post a Comment