तीन गझला : अविनाश घोंगटे






१.


घुसमट-बिसमट सल-बिल ह्यावर बोलू का?

बरंच आहे मनात त्यावर बोलू का?


एक मनावर आहे कुरूप केव्हाचे

ज्याने झाले त्या काट्यावर बोलू का?


तसा प्रवासी पक्षी आहे येथे मी

शहर सोडून मी गावावर बोलू का?


बरीच चिंता दिसते डोळ्यांमध्ये त्या 

जावून तिच्याशी प्रेमावर बोलू का?


कौतुक कितीक ह्या इमारतींचे शहरा

मी गावाचा, मी वाड्यावर बोलू का?


२.


व्हावा तितका गोंधळ झाला

गुलाब आता बाभळ झाला


इतक्या जवळी बसल्यावर तू 

श्वास खरेतर वादळ झाला


घडव विधात्या मूर्ती माझी 

देह कधीचा कातळ झाला


तीट तुझी रे काढायाला 

नशिबा जन्मच काजळ झाला


धनंजयासम वृत्ती करता 

कृष्ण कृतीचे मग फळ झाला


भटकण्यात हे जीवन गेले 

विठ्ठल अंतिम 'ते' स्थळ झाला.


३.


का बरे इतक्यात लागे एक उचकी सारखी?

राहिली बाकी कुणाची काय इच्छा आणखी?


चालतो वाटेवरी मी माझिया आहे तसा

सांगना वाहू कशाला मी कुणाची पालखी?


माझिया दैवी सुखाचे हेच कारण नेमके

जन्मभर मी वेदनेला मानले आहे सखी!


ओळखत नाही कुणीही ज्या कुणाला रे इथे 

मोठमोठ्या माणसांच्या दावतो तो ओळखी


ओळखा वेळेत अपुली नेमकी किंमत इथे 

काय मग करणार जर का भेटला ना पारखी?

.....…..............…....................


No comments:

Post a Comment